>> कोरोनाने काल ९ जणांचा मृत्यू, ६४१ पॉझिटिव्ह
राज्यात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे २३६ जणांचा बळी गेला असून नवे १६ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याच काळात १४,५४८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.१६ टक्के एवढे असले तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची वाढती संख्या रोखण्यात सरकारी यंत्रणेला यश प्राप्त झालेले नाही. राज्यात रोज सरासरी सात ते आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.
ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये १५ हजार ८६६ स्वॅबची कमी तपासणी झाली. ऑगस्टमध्ये ७१ हजार ६९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. तर, सप्टेंबरमध्ये ५५,८३३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात नवे ११,५०५ रुग्ण आढळले होते. १४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, ९३६६ रुग्ण बरे झाले होते. राज्यात जून, जुलै या महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात २९ जुलैपासून सुरू झालेले कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र अद्याप कायम आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळ, कोविड इस्पितळातील खाटा रुग्णांसाठी अपुर्या पडत आहेत. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात कोरोना गंभीर आजारी रुग्णांची खाटांच्या अभावी गैरसोय होत आहे.
आणखी ९ बळी, नवे ६४१ रुग्ण
राज्यात चोवीस तासांत आणखी ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या ४२८ झाली आहे. तर, नवे ६४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णाचे निधन झाले आहे. मडगाव येथील ५८ वर्षांचा पुरुष, सासष्टीतील ७७ वर्षांची महिला, फोंड्यातील ५८ वर्षांचा पुरुष, मडगावातील ४५ वर्षांचा पुरुष, चोडण येथील ७५ वर्षांचा पुरुष, हळदोणातील ६४ वर्षांची महिला, सान्ताक्रुझ येथील ५३ वर्षांचा पुरुष आणि सांगे येथील ७० वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले.
नवे ६४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना रुग्णाची एकूण संख्या ३३४१८ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४८६५ एवढी झाली आहे. राज्यातील कोविड स्वॅबच्या तपासणीमध्ये वाढ झाल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविड प्रयोगशाळेत २०१८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
३४४ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३४४ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८ हजार १२५ एवढी आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ४१३ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णाची संख्या १५६५२ एवढी झाली आहे. गोमेकॉमध्ये नवीन ७३ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
पणजीत नवे ३६ बाधित
पणजी परिसरात गेल्या चोवीस तासांत नवे ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यान पणजीतील रुग्णसंख्या ३११ झाली आहे. रायबंदर, सांतइनेज, करंजाळे, दादा वैद्य रस्ता भाग, तांबडीमाती, मिरामार, मळा, पाटो-रायबंदर, आल्तिनो, रायबंदर चर्चजवळ, दोनापावल, भाटले आदी भागात नवे रूग्ण आढळत आहेत.