रॉयल्सच्या घोडदौडीला कोलकाताचा ब्रेक

0
290

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखताना काल ३७ धावांनी विजय संपादन केला. कोलकाताने विजयासाठी ठेवलेले १७५ धावांचे आव्हान राजस्थानला पेलवले नाही. त्यांना निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंतच पोहोचता आले. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा १२वा सामना दुबईतील डीएससी मैदानावर खेळविण्यात आला.

नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने कोलकाता संघाला प्रथम फलंदाजीस उतरावे लागले. सुनील नारायण व शुभमन गिल यांनी संघाला ३६ धावांची सलामी दिली. उनाडकटने नारायणचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. शुभमन गिल व नितीश राणा यांनी दुसर्‍या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी रचली. दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तेवतियाने राणाला बाद केले. यावेळी फलकावर ८२ धावा लागल्या होत्या. कोलकाताचा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाच आर्चरने गिल याचा काटा काढला. गिलने ३४ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारली. दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल यांना फारशी चमक दाखवता न आल्याने कोलकाताचा संघ ५ बाद ११५ असा संकटात सापडला. ऑईन मॉर्गन याने यानंतर मोर्चा सांभाळताना २३ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३४ धावा करत कोलकाताला १७४ धावांपर्यंत पोहोचवले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने भेदक मारा करत ४ षटकांत केवळ १८ धावा मोजून २ गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पॅट कमिन्सने स्टीव स्मिथला तर शिवम मावीने संजू सॅमसनला तंबूत पाठवत राजस्थानच्या फलंदाजी फळीतील हवाच काढून टाकली. कमलेश नागरकोटीने रॉबिन उथप्पा व रियान पराग या मधल्या फळीतील फलंदाजांना माघारी धाडत त्यांची ५ बाद ४२ अशी दयनीय स्थिती केली. राजस्थानच्या मागील सामन्यातील हिरो राहुल तेवतिया याचा त्रिफळा वरुण चक्रवर्तीने उडवून राजस्थानची ११व्या षटकांत ६ बाद ६६ अशी बिकट परिस्थिती केली. यानंतर टॉम करनने एकाकी झुंज देत नाबाद अर्धशतक झळकावत पराभवाचे अंतर कमी केले. राजस्थानला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचता आले.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः शुभमन गिल झे. व गो. आर्चर ४७, सुनील नारायण त्रि. गो. उनाडकट १५, नितीश राणा झे. पराग गो. तेवतिया २२, आंद्रे रसेल झे. उनाडकट गो. राजपूत २४, दिनेश कार्तिक झे. बटलर गो. आर्चर १, ऑईन मॉर्गन नाबाद ३४, पॅट कमिन्स झे. सॅमसन गो. करन १२, कमलेश नागरकोटी नाबाद ८, अवांतर ११, एकूण २० षटकांत ६ बाद १७४
गोलंदाजी ः जोफ्रा आर्चर ४-०-१८-२, अंकित राजपूत ४-०-३९-१, जयदेव उनाडकट २-०-१४-१, टॉम करन ४-०-३७-१, श्रेयस गोपाळ ४-०-४३-०, रियान पराग १-०-१४-०, राहुल तेवतिया १-०-६-१

राजस्थान रॉयल्स ः जोस बटलर झे. वरुण गो. मावी २१, स्टीव स्मिथ झे. कार्तिक गो. कमिन्स ३, संजू सॅमसन झे. नारायण गो. मावी ८, रॉबिन उथप्पा झे. मावी गो. नागरकोटी २, रियान पराग झे. गिल गो. नागरकोटी १, राहुल तेवतिया त्रि. गो. वरुण १४, टॉम करन नाबाद ५४ (३६ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), श्रेयस गोपाळ झे. कार्तिक गो. नारायण ५, जोफ्रा आर्चर झे. नागरकोटी गो. वरुण ६, जयदेव उनाडकट झे. नागरकोटी गो. कुलदीप ९, अंकित राजपूत नाबाद ७, अवांतर ७, एकूण २० षटकांत ९ बाद १३७
गोलंदाजी ः सुनील नारायण ४-०-४०-१, पॅट कमिन्स ३-०-१३-१, शिवम मावी ४-०-२०-२, कमलेश नागरकोटी २-०-१३-२, वरुण चक्रवर्ती ४-०-२५-२, कुलदीप यादव ३-०-२०-१