म्हादईप्रश्नी गोव्याचे हितरक्षण करण्यात सरकार अपयशी

0
280

>> आलेक्स रेजिनाल्ड यांची टीका

राज्यातील भाजप सरकार म्हादई प्रश्‍नी गोव्याच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. म्हादईचा गोव्यात येणारा पाण्याचा प्रवाह कर्नाटकाने वळविला तरी राज्य सरकार गप्प बसले आहे. भाजपला केवळ राजकीय पातळीवर फोडाफोडी करून आपले सरकार टिकवायचे आहे, अशी टीका कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रोग्रेसिव्ह फ्रंट, गोवाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

राज्य सरकारने म्हादईप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कालव्याचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक दाखले घेतलेले नाहीत. भाजप सरकार केवळ न्यायालयात याचिका दाखल करून गप्प बसले आहे. दुसर्‍या बाजूने कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी राजकीय व इतर आघाड्यांवर जोरात काम करीत आहे, असेही आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.

आपण म्हादई प्रश्‍नी लोकांच्या सोबत राहणार आहोत. आता म्हादईच्या रक्षणार्थ नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. म्हादईबरोबरच रेल्वे चौपदरीकरण व इतर विषयांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, असेही आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.
कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविल्याने सरकारने निषेध करायला हवा होता, परंतु, राज्यात सरकारी पातळीवर शांतता दिसून येत आहे, अशी टीका पर्यावरणप्रेमी प्रा. प्रजल साखरदांडे यांनी केली.