चार राज्यांत पोटनिवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाची असमर्थता

0
291

>> इतर राज्यांतील ५६ पोटनिवडणुका जाहीर

आसाम, केरळ, तामीळनाडू व पश्‍चिम बंगालमध्ये सद्यस्थितीत निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. या राज्यांतील पोटनिवडणुका त्यामुळे घोषित करता येत नसल्याचे आयोगाने काल सांगितले. राज्यांच्या मुख्य सचिवांकडून तसेच मुख्य निर्वाचन अधिकार्‍यांकडून तशा प्रकारचे नकारात्मक अहवाल आल्याने हे करावे लागल्याचे आयोगाने स्पष्ट केले. आसाममधील रंगपारा व सिबसागर, केरळमधील कुट्टनाड व चावरा, तामीळनाडूतील तिरुवोत्तियुर व गुडियट्टम आणि प. बंगालमधील फलाकाटा या जागा सध्या रिक्त आहेत.

मात्र, बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी व मणिपूरमधील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक आयोगाने काल जाहीर केली. ७ नोव्हेंबर रोजी त्या पोटनिवडणुका होतील. छत्तीसगढ, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, उडिशा, तेलंगणा व उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुका ३ नोव्हेंबरला होतील. १० नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मध्य प्रदेशातील २८, गुजरातमधील आठ, उत्तर प्रदेशातील सात व इतर राज्यांतील प्रत्येकी दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.