>> बाबूश मोन्सेर्रात यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम खाते निधीच्या अभावामुळे रस्त्याची दुरुस्ती करून शकत नाही. पणजीतील रस्त्यांची कामे ‘स्मार्ट सिटी’ योजनेखाली हाती घ्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती पणजीचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
पणजीतील विविध भागांतील रस्ते खराब झाले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याची तयारी करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांची आपण दुरुस्ती करणार असल्याचे कळविले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सध्या निधीची कमतरता असल्याने ही कामे स्मार्ट सिटी योजनेखाली घेण्याची गरज आहे, असे मोन्सेर्रात म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेखाली केवळ ५० टक्के रक्कम राज्य सरकारला खर्च करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.
बायंगिणी येथील नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा पाठपुरावा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याकडून केला जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेनुसार प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही आमदार मोन्सेर्रात यांनी सांगितले.