>> राज्यात आणखी १० जणांचा मृत्यू, २७ दिवसांत २०९ बळी
राज्यात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा ४०० पार झाला असून सप्टेंबर महिन्याच्या २७ दिवसांत २०९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दरदिवशी सरासरी किमान सात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. काल रविवारी कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यूसत्र रोखण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश प्राप्त झालेले नाही. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र रोखण्यासाठी गोमेकॉमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील कोविड बळींची संख्या ४०१ एवढी झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात १४७ रुग्णांचा बळी गेला होता. तर, सप्टेंबर महिन्याच्या २७ दिवसांत २०९ जणांचा बळी गेला आहे.
चोवीस तासांत १० मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांत १० कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील २ रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर सहा तासांत मृत्यू झाला आहे. तर, एका रुग्णाला मृतावस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. गोमेकॉमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दोनापावल येथील ६९ वर्षीय महिला रुग्ण, डिचोली येथील ७३ वर्षीय महिला रुग्ण, शिरदोन येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण, नावेली सासष्टी येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्ण, भोम फोंडा येथील ६५ वर्षीय महिला रुग्ण, टोक पणजी येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्ण, मांद्रे येथील ६५ वर्षीय महिला रुग्ण, आगाळी – फातोर्डा येथील ८९ वर्षाच्या पुरुष रुग्ण, मडगाव येथील ७८ वर्षाच्या पुरुष रुग्ण आणि वास्को येथील ५३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.
७०१ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ७०१ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६,४६० एवढी झाली असून बरे होणार्या रुग्णांची टक्केवारी ८२.७९ टक्के एवढी आहे. राज्यात नवे ३८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ९५८ एवढी झाली आहे. कोरोना सध्याच्या रुग्णांची संख्या ५०९७ एवढी झाली आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेतील स्वॅबची तपासणी कमी झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. कोविड प्रयोगशाळेत १४२८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ४९ हजार ५८१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३०३ रुग्णांनी होम आयसोलेशनाचा पर्याय स्वीकारला आहे.
पर्वरीत रुग्णांचे प्रमाण वाढले
राज्यात पर्वरी येथे सर्वाधिक ३९९ कोरोना रुग्ण आहेत. साखळी ३८९, मडगाव ३६७, वास्को ३१३, पणजी २८६, कुठ्ठाळी २५८, म्हापसा २५१, वाळपई २२९, चिंबल २२६, शिवोली २२५, पेडणे २२३, खोर्ली येथे २१९, डिचोली १६९, कांदोळी १५५, फोंडा ११८, हळदोणा ११५, कासावली ११६, धारबांदोडा ११६ तर काणकोणात ११० रुग्ण आहेत.