प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.
बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, दि. ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जायचे. त्यांनी १६ भाषांत जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
अपूर्ण इच्छा
बालसुब्रह्मण्यम हे प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे मोठे चाहते होते. बालसुब्रमण्यम यांना मोहम्मद रफी यांच्यासोबत एखाद्या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची खूप इच्छा होती. परंतु ही त्यांची इच्छा कधीही पूर्ण होऊ शकली नाही. एका मुलाखतीत बालसुब्रह्मण्यम यांनी बोलताना, मी रफी साहेबांचा प्रचंड मोठा चाहता आहे, पण त्यांच्यासोबत गाण्याची कधी संधीच मिळाली नाही, याची खंत वाटते असे सांगितले होते.