मोसमी पावसाचा नवा उच्चांक

0
259

>> ५९ वर्षांचा विक्रम मोडला, १६२ इंचांची नोंद

राज्यात यावर्षी मोसमी पावसाने नवीन उच्चांक निर्माण करून वर्ष १९६१ मध्ये नोंद झालेल्या १६० इंच पावसाच्या विक्रमाला मागे टाकले आहे. राज्यात आत्तापर्यंत १६२.२४ इंच पावसाची नोंद झाली असून मोसमी पावसाची सरासरीपेक्षा ४१ टक्के जास्त नोंद झाली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वर्ष १९६१ मध्ये १६० इंच पावसाची नोंद झाली होती. तर, यावर्षी २५ सप्टेंबरपर्यंत १६२ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यापूर्वी १९७० मध्ये १५७ इंच पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी २०१९ मध्ये १५५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

उत्तर गोव्यात ४२ टक्के आणि दक्षिण गोव्यात ४० टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे आत्तापर्यंत १९४.२२ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथे १७५.२९ इंच, वाळपई येथे १७४.७४ इंच, साखळी येथे १७४.१७ इंच अशी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. केपे, सांगे येथेही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात यावर्षी उच्चांकी पावसाची नोंद झाली असली तरी, गत वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात नुकसान झाले आहे. गतवर्षी धरणातून पाणी अचानक सोडण्यात आल्याने मोठे नुकसान झाले होते.