>> रोहित शर्माचे तडाखेबंद अर्धशतक
>> जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टचा प्रभावी मारा
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा याच्या तडाखेबंद ८० धावांवर आरुढ होत काल बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सचा ४९ धावांनी दारुण पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा पाचवा सामना मुंबईने सहज जिंकला. अमिरातीमध्ये मिळविलेला मुंबईचा हा पहिलाच विजय ठरला. मुंबईने विजयासाठी समोर ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला ९ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात संथ झाली. ट्रेंट बोल्टने शुभमन गिल याला पहिलेच षटक निर्धाव टाकत दबाव टाकला. गिल व नारायण ही सलामी जोडी फार काळ खेळपट्टीवर टिकली नाही. पॉवरप्ले संपण्यापूर्वीच ही दुकली तंबूत परतली होती. यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक व नितीश राणा यांनी तिसर्या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. परंतु, अपेक्षित वेगाने त्यांना धावा जमवता आल्या नाहीत. ऑईन मॉर्गन व आंद्रे रसेल या धोकादायक द्वयीला बुमराहने तंबूत पाठवून मुंबईचे काम सोपे केले. तळाला कमिन्सने १२ चेंडूंत ३३ धावा जमवत मनोरंजन केले. त्यामुळे केकेआरच्या पराभवाचे अंतर थोडे कमी झाले.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. जलदगती गोलंदाज शिवम मावीचा चेंडू ‘पूल’करण्याच्या नादात डी कॉक पहिल्या गड्याच्या रुपात परतला. मावीने टाकलेले डावातील हे दुसरे षटक निर्धाव ठरले. कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी दुसर्या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आपल्या नेहमीच्या लयीत दिसला. त्याने मुक्तपणे फटकेबाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आपली ८० धावांची खेळी त्याने ३ चौकार व ६ षटकारांनी सजवली. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वी सूर्यकुमार यादव धावबाद झाला. रोहितने नारायणचा चेंडू लेग साईडला लगावून दोन धावा घेण्याचा प्रयत्न सूर्यकुमारला भोवला. नारायणने चेंडूला ‘डीप मिडविकेट’पर्यंत पाठलाग करून ‘नॉन स्ट्राईकर एन्ड’ला मारलेल्या थ्रोवर मॉर्गनने सूर्यकुमारला क्रीझबाहेर गाठले. सौरभ तिवारीने १३ चेंडूंत २१ व हार्दिक पंड्याने १३ चेंडूंत १८ धावा करत आपली जबाबदारी पार पाडली. शेवटच्या दोन षटकांत मुंंबईला केवळ १७ धावाच जमवता आल्या. अन्यथा त्यांचा संघ द्विशतकी वेस ओलांडू शकला असता. मुंबईने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९५ धावांपर्यंत मजल मारली. आपल्या पहिल्या षटकात ११ धावा बहाल करूनही सुनील नारायणने आपला चार षटकांचा एकूण कोटा केवळ २२ धावा देऊन संपवत एक गडी बाद केला.
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराजित झालेला संघच या सामन्यासाठी कायम ठेवला. यंदाच्या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्स, ऑईन मॉर्गन, सुनील नारायण व आंद्रे रसेल या चार विदेशींना संधी दिली.
धावफलक
मुंबई इंडियन्स ः क्विंटन डी कॉक झे. नाईक गो. मावी १, रोहित शर्मा झे. कमिन्स गो. मावी ८० (५४ चेंडू, ३ चौकार, ६ षटकार), सूर्यकुमार यादव धावबाद ४७, सौरभ तिवारी झे. कमिन्स गो. नारायण २१, हार्दिक पंड्या स्वयंचित गो. रसेल १८, कायरन पोलार्ड नाबाद १३, कृणाल पंड्या नाबाद १, अवांतर १४, एकूण २० षटकांत ५ बाद १९५
गोलंदाजी ः संदीप वारियर ३-०-३४-०, शिवम मावी ४-१-३२-२, पॅट कमिन्स ३-०-४९-०, सुनील नारायण ४-०-२२-१, आंद्रे रसेल २-०-१७-१, कुलदीप यादव ४-०-३९-०
कोलकाता नाईट रायडर्स ः शुभमन गिल झे. पोलार्ड गो. बोल्ट ७, सुनील नारायण झे. डी कॉक गो. पॅटिन्सन ९, दिनेश कार्तिक पायचीत गो. चहर ३०, नितीश राणा झे. हार्दिक गो. पोलार्ड २४, ऑईन मॉर्गन झे. डी कॉक गो. बुमराह १६, आंद्रे रसेल त्रि. गो. बुमराह ११, पॅट कमिन्स झे. हार्दिक गो. पॅटिन्सन ३३, शिवम मावी यष्टिचीत डी कॉक गो. चहर ९, कुलदीप यादव नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ९ बाद १४६
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-१-३०-२, जेम्स पॅटिन्सन ४-०-२५-२, जसप्रीत बुमराह ४-०-३२-२, राहुल चहर ४-०-२६-२, कायरन पोलार्ड ३-०-२१-१, कृणाल पंड्या १-०-१०-०