युद्धनौकांवर तैनात झाल्या दोन रणरागिणी

0
127

भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी – सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंग यांना भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात करण्यात आले आहे. भारतीय नौदलात अनेक महिला अधिकारी जरी असल्या, तरी महिलांना युद्धनौकांवर नेमले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय नौदलात महिलांना यापूर्वी केवळ जमिनीवरून उड्डाण करणार्‍या लढाऊ विमानांचेच उड्डाण करण्याची अनुमती होती. मात्र, सबलेफ्टनंट कुमुदिनी त्यागी व सबलेफ्टनंट रिती सिंग या चार महिला अधिकारी असलेल्या सतरा सदस्यीय अधिकारी गटाचा भाग असून त्यात तटरक्षक दलाचे तीन अधिकारीही आहेत. कोची येथील आयएनएस गरूडवर झालेल्या एका समारंभात या अधिकार्‍यांना या युद्धनौकेवर ‘निरीक्षक’ हुद्द्यावर तैनात करण्यात आले.
युद्धनौकांवरून उड्डाण करणार्‍या हेलिकॉप्टरांवर या महिलांना उड्डाण प्रशिक्षण घेता येईल, असे याप्रसंगी रिअर ऍडमिरल अँटनी जॉर्ज यांनी सांगितले.

राफेललाही मिळणार महिला वैमानिक
नव्याने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या राफेल विमानांच्या वैमानिकपदीही महिलांची नेमणूक होण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. एका महिला वैमानिकाला सध्या राफेल विमानांचे उड्डाण करणार्‍या गोल्डन ऍरो स्कॉड्रनमध्ये प्रशिक्षित केले जात असल्याचे समजते. तिला मिग – २१ विमानोड्डाणांचा अनुभव असून राफेल विमानोड्डाणासाठी प्रशिक्षण सुरू आहे. सध्या भारतीय हवाई दलामध्ये १० महिला लढाऊ विमानांच्या वैमानिक असून १८ महिला नेव्हिगेटर आहेत. हवाई दलात एकूण १८७५ महिला कार्यरत आहेत.