- सुधाकर रामचंद्र नाईक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केलेल्या सुरेश रैनाला बीसीसीआयकडून ‘हिरवा कंदील’ मिळालेला नाही आणि सीएसकेचे मालक तथा माजी बीसीसीआय प्रमुख एन. श्रीनिवासन यांनीही जवळजवळ असमर्थताच दर्शविल्याने रैनाची ‘माघारी’ अवघड आहे.
टीम इंडियाचा मधल्याफळीतील ‘धाकड’ फलंदाज सुरेश रैनाने आपला आदर्श तथा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पावलावर पाऊल टाकीत भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संन्यासानंतर रैना राष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार हे निश्चित, विशेषत: प्रतिष्ठेच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न करणार अशी अपेक्षा होती.
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्याच दिवशी चेन्नईत दाखल झालेल्या सुरेश रैनाने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, अंबाती रायुडू, मुरली विजय तसेच गोलंदाजी सल्लागार लक्ष्मीपती बालाजी आदींसमवेत पाच दिवसीय प्रस्थानपूर्व शिबिरातही भाग घेतला होता. २१ ऑगस्टला चेन्नई सुपर किंग्ज संघाने दुबईला प्रस्थान केले, पण तेथे पोहोचताच सीएसकेचे जवळ जवळ १२ जण ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ निघाले त्यामुळे संघाला बराच काळ ‘कॉरेंटाइन’मध्ये गुजरावा लागला. त्यातच आणखी जबर धक्का म्हणजे उपकर्णधार सुरेश रैना आकस्मिकपणे स्वगृही परतला. पंजाबमधील पठाणकोट येथील त्याच्या नातेवाईकांवर दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात आतेभाऊ आणि त्याचे वडील असे दोघे ठार झाल्याने द्विधा मनःस्थितीत रैना स्वदेशी परतला. संघाशी बिनसल्याने रैना तडकाफडकी मायदेशी परतला अशा अफवा पसरल्या, पण अखेर त्याने हल्लीच स्पष्ट खुलासा केला आणि संघात परतण्याची इच्छाही प्रगटविली आहे. पण बीसीसीआयकडून त्याला ‘हिरवा कंदील’ मिळालेला नाही आणि सीएसकेचे मालक तथा माजी बीसीसीआय प्रमुख एन. श्रीनिवासन यांनीही जवळजवळ असमर्थताच दर्शविल्याने रैनाची ‘माघारी’ अवघड आहे.
इंडियन प्रिमियर लीगमध्ये वीराट कोहली (५४१२) पाठोपाठ सर्वाधिक धावा नोंदणार्यांत दुसर्या क्रमावर असलेला सुरेश रैना (५३६८) चेन्नईचा मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण खेळाडू असून त्याने सीएसकेतर्फे १६४ सामन्यांत ४,५२६ धावा नोंदल्या आहेत. २०१८ मध्ये पोटरीदुखीमुळे एक सामना हुकलेल्या रैनाने सीएसकेतर्फे सलग १५८ सामने खेळला आहे. सीएसकेवरील दोन वर्षांच्या बंदीच्या कालावधीत रैनाने गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते.
२७ नोव्हेंबर १९८६ रोजी मुरादनगर, गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे जन्मलेल्या आणि बालपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या रैनाने शालेय स्तरापासूनच आपली क्रिकेट गुणवत्ता झळकवीत प्रशिक्षक, क्रिकेट निरीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि केवळ १७ व्या वर्षी भारताच्या अंडर १९ संघात स्थानही मिळविले. ३० जुलै २००५ रोजी डावखुर्या रैनाने- १९ व्या वर्षी- श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी २६ जुलै २०१० रोजी श्रीलंकेविरुद्ध या डावखुर्या फलंदाजाने कसोटी पदार्पण केले आणि पदार्पणात शतक झळकविणारा १२ वा भारतीय फलंदाज बनण्याचा मानही प्राप्त केला. आक्रमक फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटविण्याची, बिकट प्रसंगी धीरोदात्तपणे ‘फिनिशर’ची भूमिका यथार्थपणे वठविण्याची गुणवत्ता असलेल्या रैनाने कसोटी आणि टी-२० या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांतही शतके झळकविलेली असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतके झळकविणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा मानही मिळविला. २०११ मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्यही होता, तसेच २०११ मधील वेस्ट इंडीज दौर्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा दुसरा युवा भारतीय बनण्याचा मानही त्याला लाभला. रैनाने आपल्या दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३२२ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असून १८ कसोटीत (१ शतक, ७ अर्धशतके) ७६८, २२६ वन डेत (५ शतके ३६ अर्धशतके) ५६१५ आणि ७८ टी-२० सामन्यांत (१ शतक ५ अर्धशतकांसह) १६०५ धावा नोंदल्या. पार्टटाइम फिरकीपटू म्हणूनही रैनाने योगदान देताना तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांत अनुक्रमे १३, ३६ आणि १३ असे बळी घेतले आहेत.
इंडियन प्रिमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार तथा मध्यावधीस गुजरात लायन्सचे कर्णधारपदही भूषविलेला डावखुरा रैना आपल्या तुफानी फटकेबाजीने प्रेक्षकांची मने जिंकतानाच प्रसंगी चिवटपणे किल्ला लढविण्यातही माहीर होता. फिटनेस तथा संघातील सकस स्पर्धेंमुळे २०१८ पासून भारतीय संघाबाहेर असलेल्या रैनाने आपल्या बेफाट डावखुर्या फलंदाजीने भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण विजयात मोलाचे योगदान दिलेले आहे. भारतीय संघाच्या विजयात त्याने दिलेले बहुमूल्य योगदान, काही सर्वोत्तम, संस्मरणीय, रोमांचक खेळींचा आढावा घेणे उचीत ठरावे…
२४ फेब्रुवारी २००४ : ढाका येथील अंडर १९ विश्वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारतीय युवा संघाने नाणेफेकीच्या अनुकूल कौलानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण आशियाई संघाच्या डळमळीत प्रारंभानंतर ३ बाद ६९ अशी घसरगुंडी घडली. तथापि, १७ वर्षीय सुरेशने जिगरबाज खेळीत डाव सावरताना ६६ धावा चोपीत भारताला २५३ धावांचा टप्पा गाठून दिला आणि नंतर हा सामना ९० धावांनी जिंकला. या सामन्यात किशोरवयीन रैनाच्या धीरोदात्त झुंजार वृत्तीचे दर्शन घडले आणि नंतर आपल्या सुमारे दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आपला हा जिगरबाज ‘धाकड’पणा सतेज राखीत भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण विजयांत मौलिक योगदान दिले. आंतरराष्ट्रीय संन्यास जाहीर केलेल्या रैनाच्या धवल कारकिर्दीतील काही महत्त्वपूर्ण वीरोचित खेळीचा आढावा असा :
२००६ : इंग्लंडविरुद्ध नाबाद ८१ : फरिदाबादच्या संथ खेळपट्टीवर इंग्लंडच्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १ बाद ७० अशी सावध पण दमदार सुरुवात केली होती; पण नंतर आकस्मिक घसरगुंडीत २२ धावांत ४ आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. सुरेश रैना हा महेंद्रसिंह धोनीच्या साथीला आला आणि उभयतांनी एकेरी, दुहेरीसह धावफलक जारी राखला आणि जम बसल्यावर आक्रमक पवित्रा अवलंबिला. रैनाने अँड्र्यू फ्लिन्टॉफला ‘बॅकवर्ड पॉईंट’ क्षेत्रातून नजाकतदार फटके लगावले तसेच लियाम प्लंकेटला ‘टारगेट’ बनविले. धोनी फ्लिन्टॉफच्या गोलंदाजीवर बाद झाला पण रैनाने आपली झुंज अखेरपर्यंत जारी राखीत भारताला ४ गडी राखून सनसनाटी विजय मिळवून दिला.
२०१४ : इंग्लंडविरुद्ध शतक : कार्डिफ स्टेडियमवरील या मुकाबल्यात रोहित शर्मा (५२) आणि अजिंक्य रहाणे (४१) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताची ४ बाद १३२ अशी स्थिती बनली. तथापि, धोनी आणि रैना जोडी पुन्हा एकदा जमली आणि जेम्स अँडरसन आणि ख्रिस ऑक्स या इंग्लंडच्या तेज गोलंदाजांचा सामना करीत १४४ धावांची भागी नोंदवीत भारताला ६ बाद ३०४ धावांचा दमदार टप्पा गाठून दिला. या सामन्यात रैनाने १०० तर धोनीने ५२ धावा चोपल्या. तीनशेहून अधिक धावांच्या तगड्या आव्हानाच्या पाठलागातील इंग्लंडचा डाव ३८.१ षटकांत १६१ धावांवर आटोपला. रविंद्र जडेजाने ४ तर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शामीने प्रत्येकी २ बळी घेतले.
२०१० : द. आफ्रिकेविरुद्ध टी-२० शतक : सेंट ल्यीसिया येथील या विश्वचषक टी-२० मुकाबल्यात सुरेश रैनाने द. आफ्रिकेच्या डेल स्टेन, मॉर्कल बंधू, जॅक कॅलिस आणि रॉरी क्लेनवेल्डट आदी अव्वल गोलंदाजांचा सामना करीत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकविणारा पहिला फलंदाज बनण्याचा मान प्राप्त केला. सलामीवीर मुरली विजय पहिल्याच षटकात बाद झाल्याने रैनाला तिसर्या क्रमावर बढती देण्यात आली आणि या जिगरबाज फलंदाजाने अखेरच्या षटकापर्यंत झुंजारपणे किल्ला लढवीत केवळ ६० चेंडूत ९ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावा फटकावीत भारताला ५ बाद १८६ धावांचा दमदार टप्पा गाठून दिला. युवराजसिंगने त्याला अखेरीस उत्तम साथ देताना ३० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेला ५ बाद १७२ धावांवर रोखीत भारताने १४ धावांनी विजय प्राप्त केला.
२०१० : श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ६२ आणि नाबाद ४१ : कसोटी कारकिर्दीत संस्मरणीय भागी नोंदलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणच्या साथीत सुरेश रैनाने निर्णायक विजयी भागी नोंदवली. कोलंबो येथील कसोटीत, सेहवागच्या १०५ चेंडूवरील १०९ धावांनंतरही भारताची ४ बाद १९९ अशी स्थिती बनली होती आणि नवोदित रैना लक्ष्मणच्या साथीला आला. उभयतांनी पाचव्या यष्टीसाठी १०५ धावांची भागी नोंदवीत भारताला पहिल्या डावा ४३६ धावांच्या सन्मान्यजनक टप्प्यासह ११ धावांची अल्प आघाडीही मिळवून दिली. चौथ्या डावात २७५ धावांची विजयासाठी आवश्यकता असलेल्या भारताची ५ बाद १७१ अशी स्थिती बनली होती, पण लक्ष्मण आणि रैना जोडी पुन्हा एकदा जमली. लक्ष्मणने शानदार शतक ठोकतानाच चौथ्या यष्टीसाठी अविभक्त ८७ धावांची भागी नोंदवीत पाहुण्यांवर ५ गडी राखून विजय मिळविला. रैनाने या विजयी भागीत नाबाद ४१ धावांचे योगदान दिले.
२०११ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ३४ : अहमदाबाद येथील विश्वचषक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २६० धावांच्या प्रत्युत्तरात कर्णधार धोनी बाद झाला आणि भारताची ५ बाद १८७ अशी स्थिती बनली. भारताला विजयासाठी ७४ धावांची गरज असताना बहरातील युवराजच्या साथीला सुरेश रैना आला आणि उभय डावखुर्या फलंदाजांनी ‘धाकड’ फटकेबाजीत ४७.४ षटकांत ५ बाद २६१ धावा नोंदवीत भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. युवीने ६५ चेंडूत ८ चौकारांसह ५७ तर रैनाने त्याला सुरेख साथ देत २८ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३४ धावा फटकावल्या.
२०११ : पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३६ : अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात युवीच्या साथीत उपयुक्त योगदान दिलेल्या रैनाने सहा दिवसानंतर मोहालीत पाकिस्तानविरुद्ध आणखी एकदा भारताला तारले. सचिन तेंडुलकरच्या ८५ धावांनंतरही भारताची ५ बाद १८७ धावा अशी स्थिती बनली होती. पण रैनाने जिगरबाज नाबाद खेळीत ३९ चेंडूत नाबाद ३६ धावा नोंदतानाच हरभजन (१२) आणि झहीर खानच्या साथीत (९) भारताला ६ बाद २६० धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव ४९.५ षटकांत २३१ धावांवर आटोपला.
२०१५ : झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ११० : २०१५ मधील विश्वचषकातील ऑकलंड येथील सामन्यात ब्रॅडन टेलरच्या धडाकेबाज १३८ धावांवर झिम्बाब्वेने २८७ धावांचे तगडे आव्हान खडे केले होते आणि प्रत्युत्तरात भारताची ४ बाद ९२ अशी घसरगुंडी घडली. जिगरबाज रैना आणि धोनी जोडी पुन्हा एकदा तळपली आणि उभयतांनी १९६ धावांच्या अविभक्त भागीसह भारताला ६ गडी आणि ८ चेंडू राखून शानदार विजय मिळवून दिला. रैनाने १०४ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकून नाबाद ११० तर धोनीने ७६ चेंडूत ८ चौकार आणि २ षट्कारांसह नाबाद ८५ धावा चोपल्या.