राज्यात २४ तासांत कोरोनाचे १४ बळी

0
289

>> सप्टेंबरमध्ये आजवर ११२ मृत्यू, एकूण मृत्युसंख्या ३०४

राज्यात आजवरच्या उच्चांकी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल २४ तासांत झाली. सप्टेंबर महिन्याच्या गेल्या चौदा दिवसांत ११२ कोरोना रुग्णांचा बळी गेला असून राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३०४ झाली आहे.

राज्यात मागील दीड महिन्याभरापासून कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सातत्याने सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात १४७ कोरोना रुग्णांचा बळी गेला, तर, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच आजवर ११२ जणांचा बळी गेला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आलेली असली तरी हे मृत्यूसत्र रोखण्यात त्यांना यश प्राप्त झालेले नाही. आरोग्य यंत्रणेकडून राज्यातील वाढत्या मृत्यूसत्राला रुग्णांनाच जबाबदार धरले जात आहे. कोरोना रुग्ण वेळेवर सरकारी इस्पितळात येत नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.
कोरोना पॉझिटिव्ह १४ रुग्णांच्या मृत्यूंपैकी ९ रुग्णांचा मृत्यू बांबोळी येथे गोमेकॉमध्ये झाला. गोमेकॉमध्ये तीन रुग्णांचा चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ईएसआय कोविड इस्पितळात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले.

घरगुती विलगीकरणामुळे
कोविड केंद्रांत खाटा रिकाम्या
नागरिक घरगुती विलगीकरणाला प्राधान्य देऊ लागल्याने दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये पन्नास टक्के खाटा रिक्त आहेत. दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये १००६ खाटांची सोय आहे. त्यातील ५१८ खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ५४५ खाटांची सोय आहे. तेथील फक्त ४८ खाटा रिक्त आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने आपल्या पत्रकात दिली आहे.

कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के
राज्याची कोरोनातून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७८.९१ टक्के झाली आहे. मागील चोवीस तासांत ५१९ कोरोना रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९,६४८ एवढी झाली आहे.
राज्यात नवे ३०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या पंचवीस हजाराच्या जवळ येऊन ठेपली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४८९८ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४९४६ झाली आहे.
बांबोळी येथे १०९३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. स्वॅब चाचणीचे प्रमाण कमी असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी आली आहे. राज्यात २ लाख २५ हजार ९१० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
इस्पितळ आयसोलेशनमध्ये नवीन १७३ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या ३३८ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

भाजपच्या आणखी दोघा
आमदारांना कोरोना
भाजपचे आणखी दोन आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भाजपचे सांताक्रुझचे आमदार आंतोनियो ऊर्फ टोनी फर्नांडिस आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आमदार फर्नांडिस यांना दोनापावल येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर, मांद्रेचे आमदार सापटे यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोव्यातील अनेक आमदार आजवर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.