कळंगुटमधील हॉटेलवर छापा; ४२ जण ताब्यात

0
295

>> जुगारप्रकरणी कारवाई, १० लाखांची रोकड जप्त

शनिवारी मध्यरात्री कळंगुट येथील एका हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगार व्यवसायात गुंतलेल्या एकूण ४२ जणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून दहा लाख रुपये रोख, ५७३४ चीप्स (प्रत्येकी एक हजार मूल्य), ५७ मोबाईल संच, दोन स्वाईप मशीन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले.

यावेळी पोलिसांकडून या हॉटेलच्या दोन आलिशान खोल्याही सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या सर्व आरोपींविरोधात गोवा दमण दीव जुगारविरोधी कायद्यातर्ंगत कळंगुट पोलिसांकडून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंगुट पंचायत तसेच गोवा पर्यटन खात्याच्या कार्यालयात या हॉटेलविरोधात येथील आस्थापनाचा बेकायदा जुगार व्यवसायासाठी गैरवापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात येणार असल्याचे कळंगुट पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत कळंगुट पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी बहुतेकजण हे गुजरात, महाराष्ट्र तसेच दिल्लीस्थित धनाढ्य व्यावसायिक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही कारवाई कळंगुटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ, निरीक्षक विजयनाथ कवळेकर, उपनिरीक्षक दिनेश गडेकर, विराज नाईक, तसेच अन्य पोलीस पथकाच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दोन खोल्यात जुगार
या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर हा जुगार सुरू होता. यातील एका खोलीत २० तर दुसर्‍या खोलीत २२ लोक जुगार खेळत होते. अटक करण्यात आलेल्या संशयितांतील बरेच जण हे २५ ते ४५ या वयोगटातील आहेत. त्यातील काहीजण तर बर्‍याच नशेत होते.

हॉटेलवर पाळत
या हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची कुणकुण कळंगुट पोलिसांना लागली होती. त्यानुसार काल दिवसभर पोलिसांनी या हॉटेलवर पाळत ठेवली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

जप्त केलेले साहित्य

  • दोन एटीएम स्वाईप मशीन
  • जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या प्रत्येकी एक हजार रुपये किमतीच्या ५७३४ चीप्स
  • ५७ मोबाईल
    -१० लाख रुपये रोख