बांगलादेश क्रिकेट पथकाला श्रीलंकेत दाखल होताच सात दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पाळावा लागणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी काल रविवारी जाहीर केले. २७ सप्टेंबर रोजी कोलंबोत दाखल होताच दुसर्या दिवशी सरावाला मैदानावर उतरणार असे वृत्त होते.
श्रीलंकेतील काही वृत्तपत्रांनी बांगलादेशला १४ दिवसांचा कालावधी अनिवार्य असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, आता अधिकृतरित्या श्रीलंका क्रिकेट मंडळाने बांगलादेशला कळविल्यामुळे या अफवांवर पडदा पडला आहे. श्रीलंका सरकारच्या नियमानुसार देशात दाखल होताच १४ दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्रिकेटसाठी यामध्ये श्रीलंका क्रिकेट मंडळाला सूट दिली आहे की नाही याबाबत सरकारने काही जाहीर केलेले नाही.
निझामुद्दीन चौधरी यांनी यापूर्वी श्रीलंका क्रिकेट मंडळाला बांगलादेशचे म्हणणे कळवताना १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी मान्य नसल्याचे सांगितले होते.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मालिका जुलै ते ऑगस्टमध्ये होणार होती, पण कोविड -१९ साथीच्या रोगामुळे ती २७ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल.