कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांपार

0
267

>> राज्यात नवे ५५५ बाधित, ८ मृत्यू

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ हजारांवर गेली असून कोरोना बळींच्या संख्येने पावणे तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. नवे ५५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना एकूण रुग्णांची संख्या २३,४४५ तर सध्याच्या रुग्णांची संख्या ५१०४ एवढी आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ८ कोरोना रुग्णांचा काल मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या २७६ एवढी झाली आहे.

बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मडगाव येथील ईएसआय कोविड इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णाचे निधन झाले.

पणजी येथील ७९ वर्षांचा पुरुष, पर्रा बार्देश येथील ४६ वर्षीय पुरुष, केपे येथील ४४ वर्षांची महिला, मडगाव येथील ७४ वर्षांचा पुरुष, आगशी येथील ४५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले. वास्को येथील ४१ आणि प्रियोळ – फोंडा येथील ६३ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले. फोंडा येथील ५३ वर्षांच्या महिला रुग्णाचे एका खासगी इस्पितळात निधन झाले आहे.

राज्यात आत्तापर्यत २ लाख २० हजार ९२९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २३४४५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १८५० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत ५०४ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने १७६७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले.

४७३ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या १८०६५ एवढी झाली आहे. काल ४७३ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३९४ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारल्याने होम आयसोलेशनखालील रुग्णांच्या संख्येने ९ हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

पणजीत नवे ३१ रुग्ण
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे ३१ पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. पणजी परिसरातील रुग्णांची संख्या २८१ वर पोहोचली आहे. सांतइनेज, करंजाळे, फोडवे रायबंदर, दोनापावल, आल्तिनो, भाटले, वैद्य रस्ता-पणजी, मळा आदी भागात रुग्ण आढळून आले आहेत. भाटले, आल्तिनो या भागात कोरोनाचे जास्त रूग्ण आढळून येत आहेत.