कोविड-१९ तपासण्या

0
531
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज पणजी

जिथे जिथे कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला किंवा जे जे कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आले त्या सर्वांनी कोविडची टेस्ट नक्की करावी. जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा निगेटिव्ह आली तरी सर्व नियमांचे पालन करून, न घाबरता कोविडवर मात करावी.

कोविड महामारीचा प्रादुर्भाव आता सगळीकडेच, शहरात- गावागावात झालेला दिसतो आहे. घरातील संपूर्ण कुटुंब कोविड चाचणीत पॉझिटिव्ह दिसून येते आहे. लोकांमध्ये चिंता वाढू लागली आहे. बरेच जण लक्षणांशिवाय पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे बर्‍याच जणांमध्ये कोविड-१९ टेस्टबद्दल अनेक शंका निर्माण होताना दिसत आहे. तपासण्यांबाबत उलट-सुलट चर्चा चालू आहेत. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. या आजाराचा सध्या समूहसंसर्ग (कम्युनिटी स्प्रेड)झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्‍न डोकावत आहेत.
१. कधी, कोणती तपासणी करावी?
२. कोणत्या तपासणीला किती खर्च येतो?
३. कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे?
४. तपासणीला किती वेळ लागतो?
५. एचआरसीटी व त्याचा स्कोअर म्हणजे काय?
६. रॅपिड अँटीजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर यांच्यात फरक काय?
७. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे – खरंच तपासण्या करून घ्याव्यात का?

कोरोनाच्या मुख्यतः दोन प्रकारच्या तपासण्या असतात –
१) व्हायरल टेस्ट
२) अँटीबॉडी टेस्ट

कोरोनाच्या निदानासाठी व्हायरल टेस्टचाच मुख्यतः वापर होतो. रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास एचआरसीटीचा (छातीचा स्कॅन) उपयोग होतो. यामध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता समजण्यासाठी उपयोग होतो.
व्हायरल टेस्ट या मुख्यत्वेकरून ३ प्रकारच्या असतात-
१. रॅपिड अँटीजन टेस्ट
२. आरटी-पीसीआर
३. ट्रू नाट टेस्ट

तपासण्यांसाठी लागणारा वेळ
१. रॅपिड अँटीजन टेस्ट – अर्धा तास
२. आरटी-पीसीआर – २४ ते ४८ तास
३. ट्रू नाट टेस्ट – अर्धा तास
४. एचआरसीटी – अर्धा ते एक तास

तपासण्यांसाठी खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च
१. रॅपिड अँटीजन टेस्ट – ४५० रु.
२. आरटी-पीसीआर – २५००रु.
३. ट्रू नाट टेस्ट – १२०० रु.
४. एचआरसीटी – ६००० ते ८००० रु.

कोणती तपासणी कधी करावी?

  • अँटीजन टेस्ट – ज्या रुग्णांना त्वरित उपचारांची गरज आहे.
  • आरटी-पीसीआर – ज्यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट. तसेच कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेले लोक आणि परदेशातून येणारे लोक.
  • ट्रू नाट टेस्ट – मृत व्यक्तीमध्ये, बाळंतपणासाठी आलेल्या माता आणि इमर्जन्सी ऑपरेशनचे रुग्ण. रॅपिड अँटीजन टेस्ट –
    यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो. या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो. ही तपासणी इतर तपासण्यांपेक्षा स्वस्त आहे.
  • या तपासणीसाठी प्रशिक्षित व्यक्तीची गरज नाही.
  • या तपासणीमध्ये विषाणूंच्या सरफेस स्पाइकमधील अँटीजन प्रोटीन तपासले जाते.

तपासणीतील दोष –
कोरोना सदृशच लक्षणे असणार्‍या फ्लूसारख्या आजारात या तपासणीची सेन्सिटिव्हिटी केवळ ३४ ते ८० टक्के असते. त्यामुळे अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट निगेटिव्ह येऊ शकतात.
लक्षणे नसलेल्या पेशंटमध्ये नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येऊ शकते. मग ही तपासणी का केली जाते?… – ही तपासणी आरटी-पीसीआर पेक्षा स्वस्त व पटकन होणारी.

  • समूहसंसर्ग होताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करून त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.
  • ऍटीजन टेस्ट निगेटिव्ह येऊनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर आरटी-पीसीआर तपासणी केली जाते.
    आर.टी.पी.सी.आर. – रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिऍक्शन – यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या आरएनएपासूनही हजार पटीने डीएनए तयार केले जातात. जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात (जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वांत खात्रीशीर व अचूक तपासणी आहे. पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. यासाठी नाकातून किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जाते.
  • कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो. त्यानंतर फुफ्फुसात. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतुसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधीसाठी पॉझिटिव्ह येतो. त्यासाठी जंतुसंसर्गाच्या दुसर्‍या आठवड्यात कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे ठरते.

ट्रू नाट टेस्ट –
हे मशीन पूर्वी टीबीची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलीकडेच आयसीएमआरने कोविड-१९ टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.
या मशीनमध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. या तपासणीमध्येही विषाणूचा जिनोम हा अँप्लिफाय केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमध्ये विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.
या मशीनची किंमत ज्यादा असल्याने हे अजून सगळीकडे उपलब्ध नाही.

अँटीबॉडी टेस्ट –
ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते. इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.

एचआरसीटी –
ही चाचणी म्हणजे छातीचा सीटीस्कॅन असतो. लक्षणे सुरू होऊन ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या चार दिवसांनंतर ही टेस्ट हायली सेन्सिटिव्ह म्हणजे अगदी अचूक असते.
ही झाली विविध टेस्टविषयी माहिती, पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर जिथे जिथे कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला किंवा जे जे कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आले त्या सर्वांनी कोविडची टेस्ट नक्की करावी. जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा निगेटिव्ह आली तरी सर्व नियमांचे पालन करून, न घाबरता कोविडवर मात करावी.