जोकोविचला बाहेरचा रस्ता!

0
96

>> ‘लाईनवूमन’ला अनावधानाने लागला चेंडू

जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याला एका विचित्र प्रसंगामुळे यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेबाहेर जावे लागले. खराब खेळामुळे किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूच्या शानदार कामगिरीमुळे नव्हे तर अनावधानाने मारलेला चेंडू लाईनवूमनला जोरात लागल्यामुळे नोवाक जोकोविचला आयोजकांनी बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले.

जोकोविचने जर्मनीच्या जेन लेनार्ड स्ट्रफ याला तिसर्‍या फेरीत ६-३, ६-३, ६-१ असे हरवून यंदाच्या कॅलेंडर वर्षातील विजयाची मालिका २६ सामन्यांपर्यंत खेचली. त्यामुळे जोकोविच यूएस ओपन दिमाखात जिंकणार अशीच शक्यता निर्माण झाली होती. या दिशेने त्याची वाटचाल देखील सुरू होती. चौथ्या फेरीत कारेनो बुस्टाविरुद्धच्या पहिल्या सेटमध्ये जोकोविच ५-४ अशा स्थितीत होता. बुस्टाच्या सर्व्हिसवर जोकोविचकडे तीन सेट पॉईटस्‌देखील होते. त्यामुळे पहिला सेट जिंकण्याची औपचारिकता केवळ बाकी होती.

पहिला सेट संपला देखील असता परंतु, शेवटच्या गुणावेळी ०-४० अशा पिछाडीवर असताना बुस्टा याने लगावलेला फोरहँड बाहेर असल्याचे निर्णय देण्यात आला. परंतु, ‘हॉकआय’मध्ये चेंडूचा स्पर्श केवळ एका मिलीमीटरने लाईनला झाल्याचे दिसले. त्यामुळे जोकोविच निराश झाला व येथूनच खर्‍या नाट्याला सुरुवात झाली. बुस्टाने यानंतर पुनरागमन करत सर्वप्रथम ४०-४० अशी व यानंतर ‘एडव्हांटेज’ देखील मिळवली व जोकोविचचा पुढील फटका बाहेर गेल्यामुळे सामन्यात ५-५ अशी बरोबरीदेखील साधली.

५-५ अशा स्थितीत असताना पुढील गुणासाठी बुस्टाने ३०-० अशी आघाडी घेतली. यातील दुसरा फटका परतवण्याच्या नादात जोकोविच मैदानावर घसरला व त्याचा खांदा किरकोळ दुखावला. यानंतर त्याने खांद्यावर उपचारदेखील घेतले. कोर्टवर परतल्यानंतर जोकोविचला बुस्टा याचा एक कमकुवत फटका नेटच्या पलीकडे पोहोचवता आला नाही त्यामुळे तो ०-४० असा पिछाडीवर पडला. १५-ऍडव्हांटेज अशा स्थितीत असताना जोकोविचने मागे असलेल्याकडे चेंडू देण्याचा केलेला प्रयत्न लाईनवूमनला जायबंदी करून गेला.

मानेवर जोरात चेंडू आदळल्यामुळे काही सेकंद लाईनवूमनला श्‍वास घेणे कठीण झाले. जोकोविचने धावत जाऊन तिची माफी मागितली व तिला सावरले. परंतु, याचा काडीमात्र फायदा झाला नाही. स्पर्धा रेफ्री सोरेन फ्रीमल यांनी इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून जोकोविचला बेजबाबदार कृतीमुळे बाहेरचा रस्ता दाखवला. घटना अनावधानाने घडली असली तरी रागाच्या भरात, मागेपुढे न पाहता जोकोविचने चेंडू मारल्यामुळे स्पर्धेच्या कलम ३ व सेक्शन ‘टी’ अंतर्गत जोकोविचवर कारवाई करण्यात आल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.