आमदार हळर्णकर यांना डिस्चार्ज

0
312

मी कोविडसाठी गेल्या १२ दिवसांपासून गोमेकॉत उपचार घेत असून येथील डॉक्टर व नर्सेस करीत असलेले काम पाहून भारावून गेलो आहे, असे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. गेल्या १२ दिवसांपासून कोविडसाठी गोमेकॉत उपचार घेणार्‍या हळर्णकर यांना काल डिस्चार्ज देण्यात आला.

गोमेकॉतील डॉक्टर व नर्सेस ही मंडळी खरी कोविड योद्धा असून ही मंडळी रोज अथकपणे कित्येक तास काम करीत आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष ड्युटीच्या तासांपेक्षा कित्येक तास जास्त ते काम करीत असून आपण त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे हळर्णकर म्हणाले. हे लोक करीत असलेल्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही.

अन्य गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या कोविड रुग्णांना खासगी इस्पितळात दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अशा गंभीर स्वरुपाच्या कोविड रुग्णांवर गोमेकॉतच उपचार केले जातात. गोमेकॉतील कोविड उपचारांविषयी कुणी आरोप करू नयेत, असे आवाहनही हळर्णकर यांनी केले.