- चंद्रकांत रामा गावस
‘सत्य, सेवा, त्याग, माणुसकी, श्रद्धा, निःस्वार्थी वृत्ती अशा गुणांचा समावेश नीतिमत्तेत होतो. या सद्गुणांच्या जोरावरच मनुष्य आपल्या विकार व वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून शिक्षणाद्वारे विवेकबुद्धी व सारासार विचार करण्याची पात्रता निर्माण होण्याची गरज आहे….
आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन. शिक्षकवर्गाच्या सन्मानार्थ देशभर सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो. सरकारच्या वतीने राष्ट्रीय व राज्य पातळीवर आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतो. समाजाकडूनही आदर्श शिक्षकांचा गौरव होतो. मग नजरेसमोर प्रश्न उभा राहतो तो ५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा केला जातो?
५ सप्टेंबर हा डॉ.राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् स्वतः आदर्श शिक्षक होते. त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून केलेले उज्वल शैक्षणिक कार्य, समाजाला तत्त्वज्ञानविषयक दिलेली अलौकिक देणगी, शिक्षकांप्रति व शिक्षणाविषयी असलेला आदर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून जाहीर केला.
डॉ. राधाकृष्णन् हे भारतातील थोर तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व भारत देशाचे राष्ट्रपती होते. तसेच संस्कृतीचे पूजक, प्रकांड पंडित आणि चारित्र्यसंपन्न होते. शिक्षणातील गहन विषयही ते अत्यंत साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्यांनी जवळजवळ ४० वर्षे केलेले शैक्षणिक कार्य स्पृहणीय असे असल्यामुळे ते समस्त शिक्षक बांधवांना आणि समाजाला प्रेरक ठरले होते.
शिक्षक हा शाळेचा महत्त्वाचा घटक असतो. विद्यार्थ्यांचे भवितव्य हे अधिक उज्वल आणि अर्थपूर्ण करण्याचे महान कार्य शिक्षकाला करायचे असते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी शिक्षक हा आदर्श व उपक्रमशील हवा. अशा प्रकारची अनेक मते समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्त करतात. संस्कृत सुभाषितकारांनी आदर्श शिक्षकाची चांगली लक्षणे सांगितली आहेत ती अशी…
सद्वर्तनं च विद्वत्ता तथा अध्यापन कौशलम्|
शिष्या प्रिया त्वमेतद् ही गुरोः गुण चतुष्टयम् |
ज्ञानतृष्णा, विद्यार्थी निष्ठा सदा अध्यापन दक्षतां|
एकात्मता महोत्सवः शिक्षक गुण पंचकम् ॥
शिक्षक सद्वर्तनी असावा. विद्वान असावा. कुशल असावा आणि तो शिस्तप्रिय असावा. गुरूच्या ठिकाणी या चार गुणांची अपेक्षा असते. तसेच तो शिक्षक ज्ञानपिपासू, विद्यार्थ्यांविषयी निष्ठा ठेवणारा, शिकविण्यात दक्ष, राष्ट्रीय एकात्मतेबद्दल आस्था ठेवणारा आणि नेहमी उत्साही असणे, ही आदर्श शिक्षकाची खरी लक्षणे होत.
डॉ. राधाकृष्णन् यांचे आदर्श शिक्षक म्हणून असे गुणवत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व होते. या शिक्षकदिनानिमित्त त्यांच्या अंगी असलेल्या आदर्श गुणांची माहिती आपण जाणून घेऊ या. तसेच त्यांचे मौलिक शैक्षणिक कार्य आजच्या शिक्षक पिढीला प्रेरणादायी ठरेल असेच होते.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमधील तिरुत्ताणी या लहानशा गावात ५ सप्टेंबर १८८८ रोजी राधाकृष्णन् यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण गावातच गेलं. घरच्या धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर सुसंस्कार घडले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. पुढील माध्यमिक शिक्षण त्यांनी तिरुपती येथील लुथरन मिशन हायस्कूलमध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी उच्च श्रेणीत प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन मद्रासच्या व्हुरीस कॉलेजातून पदवी संपादन केली. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता त्यांनी अनेकविध विषयांवरच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. हिंदू धर्माचे यथातथ्य रूप समजावून घेण्यासाठी त्यांनी प्राचीन ग्रंथांचाही अभ्यास करून ‘वेदान्तातील नीतिशास्त्र’ विषयावर तेथील विद्यापीठात प्रबंध सादर करून एम्.ए.ची पदवी प्राप्त केली.
राधाकृष्णन् मुळातच कुशाग्र बुद्धीचे होते. तत्त्वज्ञानाचे बीज बालवयातच त्यांच्या मनात पेरले गेले. अगदी बालवयापासून त्यांना चिंतन आणि मनन करण्याचा छंद जडला होता. ऐन तारुण्यात त्यांनी त्या गुणांचा पुरेपूर उपयोग केला. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. ते उत्कृष्ट शैलीतून इंग्रजीतून लेखन करीत. त्यांनी ‘भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान’ ही लेखमाला लिहून भारतीय तसेच विदेशी तत्त्वज्ञानी व्यक्तिमत्त्वांना प्रभावित केले. स्वतः गीतेवर भाष्य लिहिणारे लोकमान्य टिळक म्हणाले, ‘राधाकृष्णन् यांची ‘भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान’ ही लेखमाला सरस, वैशिष्ट्यपूर्ण व निश्चितपणे वेगळी आहे.’
शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त झाल्यावर मद्रास विद्यापीठाने राधाकृष्णन् यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले आणि अल्पकाळातच त्यांना तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुखपद बहाल केले. याच दरम्यान तेथील मद्रास विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. तसेच आंध्र विद्यापीठाने त्यांना ‘डी लीट’ पदवी प्रदान केली.
डॉ. राधाकृष्णन् एक अभ्यासू, विचारवंत व ज्ञानी शिक्षक होते. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचे चालते बोलते प्रतीक होते. विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याचे मार्गदर्शक होते. शिक्षण प्रभावी व सचेतन करण्यासाठी अमूल्य वेळ देणारे निष्ठावंत शिक्षक होते. डॉ. राधाकृष्णन् यांचे शिक्षणविषयक विचार आजच्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी असेच आहेत. शिक्षणासंबंधी बोलताना ते सांगत, ‘सत्य, सेवा, त्याग, माणुसकी, श्रद्धा, निःस्वार्थी वृत्ती अशा गुणांचा समावेश नीतिमत्तेत होतो. या सद्गुणांच्या जोरावरच मनुष्य आपल्या विकार व वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून शिक्षणाद्वारे विवेकबुद्धी व सारासार विचार करण्याची पात्रता निर्माण होण्याची गरज आहे. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे तर विद्यार्थ्यांचे अज्ञान दूर करणे होय, अशी त्यांची विचारधारा होती.
डॉ. राधाकृष्णन् यांनी फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड व अमेरिका इ. देशांचा दौरा केला. या दौर्याच्या वेळी जर्मनीने त्यांना श्रेष्ठ गुणवत्तेचे मानचिन्ह बहाल केले. त्याचप्रमाणे शांतता पारितोषिकही देऊन त्यांचा गौरव केला.
डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याच शिफारशीवरून डॉ. राधाकृष्णन् यांची १२ मे १९५७ रोजी राष्ट्रपतीपदी नियुक्ती केली. १९६२ पर्यंत डॉ. राधाकृष्णन् हे भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ किताब बहाल केला. डॉ. राधाकृष्णन् यांच्यासारखे सुपुत्र भारत देशाला लाभले हे सौभाग्य होय, त्यांना सर्वपल्ली ही बहुमानाची पदवी प्राप्त झाली. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या गुरूला शिक्षक दिनी वंदन करून सुभाषितकार त्यांचा गौरव असा करतात-
शिक्षकदिन दिनस्य जनकः
भरत वर्षस्य प्रेरकः |
सर्वपल्ली इति उपाधी
राधाकृष्णन् वंदे जगद्गुरुम् ॥