जेईई व नीट परीक्षा ठरल्यानुसार

0
223

>> ६ राज्यांची पुनर्विचार याचिका फेटाळली

नीट आणि जेईई (मेन) परीक्षांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या परीक्षांचे आयोजन करण्यासाठी यापूर्वी न्यायालयाने मान्यता दिली होती.

दरम्यान १७ ऑगस्ट रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली व सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे ह्या परीक्षा ठरल्यानुसार पार पडणार आहेत.

शुक्रवारी यावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

एनटीएकडून या दोन्ही परीक्षांचे आयोजन करण्यात येते. जेईई मुख्य परीक्षा ही १ ते ६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर नीट परीक्षांचे आयोजन १३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.