गतवर्षीपेक्षा यंदा गोमेकॉत मृत्यूचे प्रमाण घटले ः आरोग्यमंत्री

0
309

राज्यात कोरोना महामारीच्या काळात गतवर्षीच्या तुलनेत जीएमसी इस्पितळात होणार्‍या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, असा दावा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत काल केला.
राज्यातील कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी वैद्यकीय उपचारांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. या उपचारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

जीएमसीमध्ये गत २०१९ मध्ये जून महिन्यात १५७ मृत्यू, जुलैमध्ये १९९ मृत्यू आणि ऑगस्टमध्ये २५२ मृत्यूंची नोंद झाली होती. या वर्षी इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे. तर, मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जूनमध्ये १६६ मृत्यू, जुलैमध्ये १८८ मृत्यू आणि ऑगस्टमध्ये २३६ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

१८६ कोरोना रुग्णांवर उपचार
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये सात वॉर्डात १८६ कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून त्यात २१ अतिगंभीर कोविड रुग्णांचा समावेश आहे. तर, मडगावच्या कोविड इस्पितळात १८६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात २३ अतिगंभीर कोविड रुग्णांचा समावेश आहे. फोंडा येथील कोविड उपजिल्हा इस्पितळात ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोमेकॉत ८८ कोविड रुग्ण दगावले
जीएमसीमध्ये ८८ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. चार कोविड रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले होते. ५० टक्के मृत्यू इस्पितळात उशिरा आणल्याने झाले आहेत. कोविड इस्पितळात ११५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १०२ जण को-मॉर्बिड कंडिशनमधील होते. ४५ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला होता, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

जीएमसीमध्ये कोरोना रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळेच जीएमसीमधील २१ डॉक्टर, २३ शिकाऊ डॉक्टर, २१ नर्स, ३५ एमटीएस कर्मचारी आणि १० तांत्रिक कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

कोरोनाचे रुग्ण अंतिम टप्प्यात इस्पितळात उपचारासाठी येतात. त्यामुळे कोरोना रुग्णांना जीवदान देणे कठीण बनते. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. उच्च शिक्षित लोकांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

प्लाझ्मा दानाला वाढता प्रतिसाद
राज्यात प्लाझ्मा दानाच्या जनजागृती मोहिमेतून प्लाझ्मा दानाबाबतचा गैरसमज दूर होऊ लागला आहे. आता प्लाझ्मा दानाला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज पाच- सहा जण प्लाझ्मा दानासाठी पुढे येत आहेत. शुक्रवारी ७ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे, अशी माहिती डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.

प्लाझ्मा दान करणार्‍यांच्या कुटुंबीयांना एक वर्ष मोफत वैद्यकीय उपचार आणि आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फार्मा कंपनीत काम करणार्‍या २० वर्षांच्या युवकाने प्लाझ्मा दान केल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.