अव्वल मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिला यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्या फेरीत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीतील माजी क्रमांक एकची खेळाडू असलेली प्लिस्कोवा गार्सियाच्या वेगवान खेळासमोर निरुत्तर झाली. गार्सियाने तब्बल ३० विजयी फटके लगावले तर झेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोवाला केवळ १३ फटके लगावता आले. प्लिस्कोवा पहिल्या सेटमध्ये ०-५ अशी पिछाडीवर होती. यानंतर तिने कसाबसा एक गुण आपल्या खात्यात जमा केला.
दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत खेचत प्लिस्कोवाने सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, गार्सियाने टायब्रेकरवर संयम राखत सेटसह सामना आपल्या नावे केला. गार्सियाचा पुढील सामना जेनिफर ब्रेडी हिच्याशी होणार आहे. दारुण पराभवानंतर प्लिस्कोवाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करताना फ्रेंच ओपनद्वारे दमदार पुनरागमनाचा इरादा जगजाहीर केला. २०१८ साली सिमोना हालेप पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर यूएस ओपनमध्ये अव्वल मानांकित खेळाडू स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गारद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
चार वर्षांपूर्वी यूएस ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या प्लिस्कोवा हिने अपेक्षांच्या ओझ्यामुळे नव्हे तर प्रतिस्पर्धी खेळाडूच्या दमदार कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागल्याचे सामन्यानंतर बोलताना सांगितले.
अन्य महत्त्वाचे निकाल
पुरुष एकेरी ः दुसरी फेरी ः नोवाक जोकोविच (१) वि. वि. काईल एडमंड ६-७, ६-३, ६-४, ६-२, स्टेफानोस त्सित्सिपास (४) वि. वि. मॅक्सिम क्रेसी ७-६, ६-३, ६-४, आलेक्झांडर झ्वेरेव (५) वि. वि. ब्रेंडन नाकाशिमा ७-५, ६-७, ६-३, ६-१, डेव्हिड गॉफिन (७) वि. वि. लॉईड हॅरिस ७-६, ४-६, ६-१, ६-४, डॅनिस शापोवालोव (१२) वि. वि. सूनवो क्वोन ६-७, ६-४, ६-४, ६-२
महिला एकेरी ः दुसरी फेरी ः पेट्रा क्विटोवा (६) वि. वि. कॅतरिना कोझलोवा ७-६, ६-२, नाओमी ओसाका (४) वि. वि. कामिला जॉर्जी ६-१, ६-२, पेट्रा मार्टिक (८) वि. वि. कॅतरिना बोंदारेंको ६-३, ६-४, इलिना रिबकिना (११) पराभूत वि. शेल्बी रॉजर्स ५-७, १-६, ऍलिसन रिस्के (१३) पराभूत वि. ऍन ली ०-६, ३-६, ऍनेट कोंटावेट (१४) वि. वि. काजा जुवान ६-४, ६-१