राज्यात गाजलेल्या मजूर घोटाळा प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून राज्याचे लोकायुक्त पी. के. मिश्रा हे त्याविषयीचा आपला निवाडा आता ९ सप्टेंबर रोजी देणार आहेत. कामगार कल्याण निधीतील पैसे राज्यातील कामगारांना देण्याऐवजी काही सरपंचांसह भलत्याच लोकांना दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती.
लोकायुक्तांनी कामगार खात्याकडून मागितलेली माहिती अजून खात्याने लोकायुक्तांना दिलेली नाही. त्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी खात्याने केली आहे.
कोविड महामारी व त्यानंतरचे लॉकडाऊन या हजारो कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळले. त्यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी कामगार कल्याण निधीतून त्यांना पैसे देण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, कामगारांच्या खात्यात जमा होणारे पैसे काही सरपंच, उपसरपंच आदींच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती. या प्रश्नावरुन कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड आदी विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. नंतर गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या प्रकरणी १३ कोटी रु.चा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यासंबंधीचा निवाडा आता ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.