पाकिस्तानने तिसर्या व शेवटच्या टी-ट्ेंटी सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच धावांनी निसटता विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता तर दुसर्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा फडशा पाडला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १९० धावा केल्या. मोहम्मद हफीझ याने सलग दुसर्या सामन्यात अर्धशतक ठोकताना केवळ ५२ चेंडूंत नाबाद ८६ धावा कुटल्या.
पदार्पणवीर हैदर अलीने ५४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन याने सर्वाधिक २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडला टॉम बँटन (३१ चेंडूंत ४६) व मोईन अली (३३ चेंडूंत ६१) यांच्या झंझावाती फलंदाजीनंतरही विजयासाठी पाच धावा कमी पडल्या. पाकिस्तानकडून वहाब रियाझने २६ धावांत २ तर शाहीन आफ्रिदीने २८ धावांत २ गडी बाद करत प्रभाव पाडला. हफीझ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.