राज्यात जेईई परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. राज्य प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जेईई परीक्षा केंद्रावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. टीसीएस – पाटो पणजी आणि शैल-शिरोडा या दोन केंद्रांवर जेईई परीक्षा घेतली जात आहे. येत्या ६ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची केंद्रात प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारे तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटर्सचा वापर करण्याची सूचना केली जात आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सरकारी यंत्रणेकडून नवीन मास्क विद्यार्थ्याला दिले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासनाच्या विविध खात्याचे अधिकारी सुरक्षा उपाययोजना पुरविण्याचे कामात गुंतलेले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपलब्ध करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले आहे.