>> महाड इमारत दुर्घटनेतून बचावला, परंतु मातृछत्र गमावले
रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारीक मंजिल ही पाच मजली इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर तब्बल १९ तासांनी वाचवण्यात आलेल्या चार वर्षीय महंमद बंगी या मुलाला अजूनही या दुर्घटनेत त्याची आई आणि दोन बहिणी ठार झाल्याची कल्पना देण्यात आलेली नाही. तो पुन्हा पुन्हा त्यांची चौकशी करीत असतो, असे त्याच्यावर उपचार करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत महंमदची आई नौशीन (३२), बहीण आएशा (६)व रुकैय्या (२) ठार झाल्या आहेत. त्यांना ढिगार्याखालून जिवंत बाहेर काढणे एनडीआरएफला शक्य झाले नाही.
महंमदला सुखरूप बाहेर काढण्यात आले व स्थानिक इस्पितळात त्याच्या किरकोळ जखमांवर उपचार करून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. तो सध्या त्याच्या मावशीकडे राहायला गेला आहे.
इमारत कोसळून ढिगार्याखाली सापडताच आपल्याला फार तहान लागली, तेव्हा आपण अल्लाकडे पाणी मागितल्याने महंमदने मावशीला सांगितले. सगळीकडे अंधार होता, त्यामुळे आपण तेथेच झोपी गेलो असेही त्याने सांगितले. बाहेर जाण्याची वाट दिसत नसल्याने त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही, तो जागीच बसून राहिला अशी माहिती त्याचे काका बशीर पारकर यांनी पत्रकारांना दिली. मात्र, आता सुखरूप बाहेर काढला गेल्यानंतर तो सतत आपली आई आणि बहिणींची चौकशी करीत असतो असे ते म्हणाले. त्या आता ह्या जगात नाहीत हे आम्ही त्याला सांगितलेले नाही असे त्यांनी गदगदल्या स्वरांत सांगितले. त्याच्या आई व बहिणींचे मंगळवारी दफन करण्यात आले. महंमदचे वडील दुबईत काम करतात. सध्या महंमदला त्याच्या मावशीकडे ठेवले जाईल असे कुटुंबियांनी ठरवले आहे.
मेहरुन्निसा काझी या साठ वर्षीय महिलेलाही या इमारतीच्या ढिगार्याखालून तब्बल २६ तासांनंतर बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, ती अद्याप इस्पितळात उपचार घेत आहे.