आयपीएलमध्ये होणार उत्तेजक चाचणी

0
133

>> ‘नाडा’चे अधिकारी जाणार यूएईला

राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेचे (नाडा) तीन उच्चस्तरीय अधिकारी व सहा उत्तेजक प्रतिबंध अधिकारी इंडियन प्रीमियर लीग दरम्यान खेळाडूंचे नमुने घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाणार आहेत. आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. नाडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाडाकडून स्पर्धा सुरू असताना व स्पर्धेपूर्वी किंवा समाप्तीनंतर मिळून किमान ५० नमुने घेतले जाणार आहेत.

६० सामन्यांची ही स्पर्धा १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ‘नाडाचे नऊ सदस्य संयुक्त अरब अमिरातीमध्ये असणार आहेत. नमुने घेण्यासाठी अमिरातीच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती नाडाने दिल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे. आयपीएल स्पर्धा तीन मैदानांवर खेळविली जाणार आहे. या मैदानांवर प्रत्येकी एक उच्चस्तरीय अधिकारी व दोन प्रतिबंध अधिकारी असतील.

अमिरातीमधील संस्थेचे स्वयंसेवक नाडाच्या अधिकार्‍यांना या कामी मदत करतील. नमुन्यांसाठी येणारा खर्च नाडा उचलणार की बीसीसीआयला उचलावा लागणार याबाबत उभय संघटनांनी अजूनपर्यंत काहीही ठोस जाहीर केलेले नाही. भारतात होणार्‍या स्पर्धांत नाडाकडून नमुने जमवणे, नमुने पाठवणे व चाचणी आदींचा सर्व खर्च केला जातो. नाडाच्या सर्व अधिकार्‍यांना बीसीसीआयने तयार केलेल्या जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे.

नाडाने बीसीसीआयला पाच ठिकाणी उत्तेजक चाचणी केंद्रे उभारण्यास सांगितली आहेत. यातील तीन ही अबुधाबी, शारजा व दुबई येथे असतील तर दोन ही दुबई व अबुधाबीतील सराव करण्याच्या ठिकाणांवर असतील. नाडाकडून मर्यादित स्वरुपात नमुने घेण्यात येणार असले तरी दुबई येथून आंतरराष्ट्रीय उत्तेजक संस्थेच्या दोहा येथील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत नमुने पाठविणे कमी खर्चिक असणार आहे.

अमिरातीमधील कोरोनाची परिस्थिती भारताच्या तुलनेत चांगली असल्यामुळे नमुन्यांना कोणत्याही अडचणींविना दोहाला पाठवता येणार आहे. स्पर्धा भारतात असती तर नाडाला नमुने पाठविणे कठीण गेले असते.