गणेशपूजेतील २१ पत्री

0
1180
  • डॉ. मनाली पवार
    माका ही पावसाळ्यात आढळणारी वनस्पती असून हे चांगले केश्यद्रव्य, तसेच चांगले रसायन आहे. ताज्या माक्याचा स्वरस १० मिलि. रोज सकाळी नित्य एक महिना सेवन करावा व पथ्यामध्ये फक्त दूध प्यावे. असे केल्याने शरीर निरोगी होते. बल व कांती वाढते व मनुष्य दीर्घायू होतो.

विघ्नहर्त्या गजाननाला दूर्वा व लाल जास्वंदीचे फूल अतिप्रिय म्हणून नेहमीच पूजा दूर्वा व लाल जास्वंदीचे फूल वाहून केली जाते. पण गणेशचतुर्थीमधील गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे. गणेशचतुर्थीमध्ये आपण कित्येक घरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतो. यावेळी जी षोडशोपचारे पूजा केली जाते त्यात दूर्वांव्यतिरिक्त अनेक पत्री वाहिल्या जातात. उदाहरणार्थ मालती, माका, बेल, श्‍वेतदूर्वा, बोरपत्र, तुळसपत्र, शमीपत्र, आघाड्याची पाने, डोरलीची पाने, कण्हेरीची पाने, मंदारपत्र, अर्जुनपत्र, विष्णुक्रांत, डाळिंबाची पाने, देवदाराची पाने, पांढरा मख्त, पिंपळाची पाने, जाईची पाने, केवडा, अगस्तीप्रत. या अशा किरकोळ वाटणार्‍या झाडांच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहेत.

१) मधुमालती ः- मधुमालती ही वेल तशी शहरात, गावात आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळ्या रंगांची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्ट्य.

  • फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

२) माका ः- पावसाळ्यात आढळणारी ही वनस्पती आहे. माका हे चांगले केश्यद्रव्य आहे, हे बर्‍याच जणांना माहीत आहे.

  • सध्या माका मिळत असल्याने माक्याच्या पानांचा रस काढून केस गळत असल्यास डोक्याला चोळल्यास केस उगवतात.
  • माक्याचा रस दुधाबरोबर नित्य सेवन केल्याने गर्भपात होत नाही.
  • माका हे चांगले रसायन आहे. ताज्या माक्याचा स्वरस १० मिलि. रोज सकाळी नित्य एक महिना सेवन करावा व पथ्यामध्ये फक्त दूध प्यावे. असे केल्याने शरीर निरोगी होते. बल व कांती वाढते व मनुष्य दीर्घायू होतो.
  • मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.
    ३) बेल- शंकराच्या पिंडीवर वाहणारे हे बेलपत्र सर्वांना परिचित आहे.
  • या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतांवर गुणकारी.
  • संग्रहणीवर अत्यंत उपयुक्त उपचार आहे. बेलगिरी चूर्ण १० ग्रॅम सुंठचूर्ण आणि गूळ एकत्र खलून तीन ग्रॅमच्या मात्रेत ताकाबरोबर सेवन केल्याने जुनाट संग्रहणीसुद्धा बरी होते.
  • प्रवाहिका, अतिसार, आंव पडणे आदी व्याधींमध्ये बेलगराचा उपयोग होतो.

४) श्‍वेतदूर्वा ः- ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्‍वेत) आणि निळा (निल) या दोन जाती आहेत. पांढर्‍या दूर्वा गणेशाला प्रिय असतात.

  • नाकातील घोळणा फुटल्यास दूर्वाच स्वरस घालावा.
  • ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वा वापराव्यात.
  • श्‍वेतप्रदर, रक्तप्रदर व्याधींमध्ये दूर्वांचा काढा किंवा दूर्वा स्वरस सेवन केल्याने लगेच आराम मिळतो.
  • दूर्वाचा रस अमृतासमान असतो.

५) बोरपत्र ः- मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळजळणं, ताप, दाह यांत उपयुक्त ठरतो. बोराच्या बियांचे चूर्ण चेहर्‍यावर लावल्यास पुटकुळ्या जातात.

६) तुळसपत्र ः- तुळस म्हणजे विष्णुवल्लभा होय. सर्व रोगनिवारक, जीवनीय शक्तिवर्धक अशा तुळशीला प्रत्यक्ष देवी म्हटलेले आहे.

  • ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी, जवळपास प्रत्येक घरांमध्ये असायलाच हवी.
  • ही डासांना पळवून लावते. म्हणून सगळ्या प्रकारच्या तापात उपयुक्त आहे. मलेरियासारख्या तापात तुलसीपत्रांचा काढा तीन-तीन तासांच्या अंतराने सेवन केल्याने आराम मिळतो.
  • न्युमोनियामध्ये काळ्या तुळशीचा स्वरस गायीच्या तुपातून चाटल्याने आराम मिळतो.
  • कफ, दमा, सर्दी, किटकदंश तसेच कॅन्सरसारख्या रोगांवर तुळशीचा रस उपयोगी पडतो.
  • सध्या कोविड-१९च्या महामारीत तुळशीची पाने, सुंठ, दालचिनी व मिरी यांचा काढा उपयुक्त ठरतो.

७) शमीपत्र ः- शमीला सुप्त ‘अग्निदेवता’ असेही म्हणतात. हा वृक्ष कोरड्या हवामानात वाढणारा आहे.

  • त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमीपत्र प्रभावी ठरते.

८) आघाडा ः- ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. ही वनस्पती पडीक जागेत माळरानावर बघावयास मिळते.

  • आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे.
  • अर्श चिकित्सेमध्ये आघाड्याच्या बियांचे चूर्ण ३ ग्र्रॅमच्या मात्रेत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने रक्ती मूळव्याधीमध्ये आराम मिळतो.
  • अनियमित मासिक धर्मामध्ये किंवा गर्भधारणा होत नसल्यास आघाड्याच्या पानांचा रस गायीच्या दुधामध्ये वाटून ऋतूस्नानानंतर चार दिवस घेतल्याने गर्भधारणा होते. हा प्रयोग तीन वेळा करावा.

९) डोरलीची पाने ः- या रोपाला ‘काटे रिंगणी’ म्हणून ओळखतात. या वनस्पतीच्या पानावर देखील काटे असतात.

  • त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगावर हे झुडूप फायदेशीर ठरते.
  • काही प्रांतात याच्या पानांची भाजी खाण्याची पद्धत आहे.

१०) कण्हेरीची पाने ः- परसबागेत हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो.

  • ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. वातविकारात महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.
  • संक्रामक रोगामध्ये कण्हेरीच्या पानाने सिद्ध केलेल्या तेलाने मालीश केल्याने जीवांचा नाश होतो.
  • त्वचाविकारात कण्हेरीच्या पानांचा उपयोग होतो.

११) मंदार पत्र/रुईपत्र ः- याचा चीक विषारी असतो. त्वचेला लागल्यास फार दाह होतो व फोड येऊ शकतात.

  • तळपायात काटा मोडल्यास तळपायाला याच्या पानांचा चीक लावल्यास काटा निघतो.
  • हे उत्तम कफनाशक आहे.
  • शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांच कार्य सुधारणे व पर्यायाने शरीराची चयापचय क्रिया सुधारणारी आहे. म्हणून शरीर निरोगी करणारे औषध आहे.

१२) अर्जुन-बलिष्ट वृक्ष ः- यामध्ये हृदयपोषक गुण असतात.

  • नैसर्गिक कॅल्शिअम यात मुबलक प्रमाणात असते.
  • अस्थी जोडण्यासाठी त्यात मजबुती येण्यासाठी सालीचे चूर्ण वापरतात.

१३) विष्णुक्रांत ः- बुद्धीवर्धक अशी ही वनस्पती आहे.

१४) डाळिंबाची पानेः- त्रिदोषहर, तृप्तिकारक, पाचक, मलावरोधक, स्निग्ध, मेध्य, बल्घ, ग्राही, तृष्णा, दाह, ज्वर, हृदयरोग, मुख दुर्गंध, कंठरोग आणि मुखरोगनाशक आहे.

  • ताज्या पानांचा रस किंवा चटणी मोहरीच्या तेलात सिद्ध करून केस गळतीवर लावल्यास फायदा होतो.

१५) देवदाराची पानेः- हा महाकाय वृक्ष पश्‍चिमघाट, हिमालयात जास्त आढळतो.

  • कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो.

१६) पांढरा मारवा ः- ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते.

१७) पिंपळाची पाने ः- याला ‘बोधीवृक्ष’ म्हणतात. हा वृक्ष बहुवर्षायू आहे. याची पाने वर्ण्य आहेत. व्रणरोपक, वेदस्थापक, शोधहर व रक्तशोधक आहे.
याचा लेप जखमांना लावल्याने जखमा भरून येतात.

१८) जाईची पान ेः- ही वेल सुगंधी फुलांची आहे.

  • तोंड आल्यावर जाईची पाने खातात.
  • जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो.

१९) केवडा ः- ही वनस्पती समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.

२०) धोतरा ः- ही वनस्पती पडीक जागेत उगवणारी विषारी वनस्पती आहे. वेदनानाशक, कप, संधिवातावर उपयुक्त.

२१) अगस्तीः- म्हणजेच हादगा. याची भाजी छान लागते. याच्या पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, विटामिन ए, बी, सी, प्रचुर मात्रांमध्ये असते.

  • सगळ्या प्रकारच्या तापामध्ये पानांचा रस उपयुक्त ठरतो.
  • अन्तर्विद्रधिमध्ये पाने गरम करून शेकल्यास गाठ विरघळते.