– डॉ. सुरज स. पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)
आपण जे अन्न वाया घालवतो, टाकून देतो हे बंद केले पाहिजे. गरजेपुरतीच साठा करणे, तयार करणे महत्त्वाचे. अशी कित्येक कुटुंबे आहेत ज्यांना १ वेळेचे जेवणसुद्धा मिळत नाही व उपासमार झाल्याने त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागतात.
‘ऍनोरेक्सिया नरव्होसा’ ही खाण्याशी संबंधित अशी एक मानसिक व्याधी आहे ज्यात मनुष्याला नेहमी बारीक व्हावे असे वाटत असते आणि त्यासाठी अस्वाभाविक, चित्रविचित्र पद्धतीने प्रयत्न चालू असतात. आहाराबद्दल चुकीचा आणि विकृत असा समज त्यांनी केलेला असतो. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास गैरसमजच. सतत वजन कमी करण्याचा व शरीराचा आकार सुस्थितीत आणण्याचा अट्टहास त्यांचा असतो. काही प्रमाणात ते करणे योग्यही असते पण हेच जर ‘ऑब्सेशन’ किंवा मनाला पछाडणारे झाले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावरदेखील होतात. उपवास करणे, खाणेपिणे सोडून देणे, कॅलरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवल्यानंतर मुद्दामहून वांतीकरुन जेवण बाहेर काढणे (बुलीमिया), डाययुरेटिक्स (लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ), लॅक्झेटिव्ह्ज् (रेचक/कोठा साफ करणारे पदार्थ), एनिमा (बस्ती), आहारासम्बंधित जाहिराती यांचा चुकीच्या प्रकारे वापर करणे, अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करणे यांसारख्या गोष्टी करत बसतात आणि याने जीवितहानीसुद्धा होऊ शकते.
मानसिक खच्चीकरण होते, भावनिक (इमोशनल) होतात व वर्तणुकीमध्ये विचित्र बदल होतो. हृदय, वृक्क(किडनी), मेंदू सारख्या अवयवाना मार बसतो, त्यांचे पोषण होत नाही व निकामी होऊ लागतात. चिंता, औदासिन्यता वाढते, सतत मूड-स्विंग्स होतात, व्यक्तिमत्त्वाच्या संबंधित व्याधी होतात (पर्सनॅलिटि डिसॉर्डर), ऑब्सेसिव्ह कम्पल्सीव डिसॉर्डर इ. स्वतःला इजा पोहोचविणे, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढते. यासोबत गेल्या लेखात उल्लेखीत जवळपास सर्वच लक्षणे कमी-जास्त प्रमाणात असू शकतात.
शरीराच्या कुपोषणाने मनावरही तेवढेच भयानक परिणाम होत असतात- जसे की वजनकाट्यावर सतत प्रत्येक जेवणानंतर आपले वजन तपासणे, पुनःपुनः आरशामध्ये स्वतः न्याहाळणे, मोजपट्टी (मेजरिंग टेप)ने मोजमाप काढणे, नेहमी काही न काही कारण देऊन न जेवणे, खाण्याच्या पदार्थांमधील कॅलरींचा विचार करत बसणे व ते फिटनेस बँड असल्यास त्याने मोजणे किंवा इन्टरनेटवरुन प्रत्येक गोष्टींमधील फॅट्स, कॅलरींबद्दल सतत हिशोब लावत बसणे, जेवण अर्धे चावून बाकीचे थुंकून टाकणे, लठ्ठ असल्यास लोकांमध्ये न मिसळणे, त्यांच्यापासून दूर राहणे, जाड़सरपणा लपविण्याकरिता स्वतःला नेहमीच भरपूर सार्या कपड्यांनी झाकून ठेवणे, विचारांमुळे झोप न लागणे, चिडचिड होणे, कुठल्याही कामाची इच्छा नसणे, शारीरिक सम्बंध नकोसे वाटणे या तक्रारी असतात.
पोटातील व आतड्यांचे आजार जसे की क्रॉन्स डीजीस, गॅस्ट्रिक अल्सर, अल्सेरेटीव कोलायटीस, सिलीऍक डीजीस, अतिसार, उलटी सारख्यांच्यामुळे सुद्धा खाणे कमी होते व कुपोषण होऊ शकते.
तान्त्रिकदृष्ट्या ह्या सर्व गोष्टी ओळखायच्या कशा. बाकी मूळ कारण शोधण्यासाठी सखोल परीक्षण इ. करणे गरजेचे आहे. एंडोस्कोपी, सोनोग्राफी, रक्ताची तपासणी इ. परीक्षणे गरजेच्या पडू शकतात.
‘इण्डियन ऍकेडमी ऑफ पेडीयाट्रीक्स’च्या मते मालन्यूट्रीशनचे(कुपोषण) ग्रेडप्रमाणे विभाजन केले आहे.
- वयानुसार वजन ८०% पेक्षा जास्त असल्यास प्राकृत आहे.
- वयानुसार ७१-८०% मध्ये वजन कमी असल्यास, माईल्ड(मृदू) मालन्यूट्रीशन. ग्रेड १
- वयानुसार ६१-७०% मध्ये वजन कमी असल्यास, मॉडरेट(मध्यम) मालन्यूट्रीशन. ग्रेड २
- वयानुसार ५१-६०% मध्ये वजन कमी असल्यास, सीव्हीयर(तीव्र) मालन्यूट्रीशन. ग्रेड ३
- वयानुसार ५०% पेक्षा वजन कमी असल्यास, व्हेरी सीव्हीयर(खूप तीव्र) मालन्यूट्रीशन. ग्रेड ४
पीईएम (प्रोटिन एनर्जी मालन्यूट्रीशन) जर असेल तर त्याचे प्रमाण मोजण्यासाठी वजन, उंची, मध्यहात-बाहुचा परिघ/घेर(मिड-आर्म सरकमफरन्स) आणि डोक्याचा परिघ (हेड सरकमफरन्स) हे बघितले जाते. एक्युट पीईएम (३ महिन्यापेक्षा कमी काळ असलेला)मध्ये वजन व मध्यहाताचा परिघ प्रभावित होतो तर क्रॉनीक पीईएम (३ महिन्यापेक्षा जास्त काळ असलेला)मध्ये उंची व डोक्याचा परिघ प्रभावित होतो. तसेच बँगल टेस्ट, शाकिर टेस्ट, उदानी क्लासीफीकेशनने कुपोषणाचा ग्रेड(श्रेणी) ठरवता येते. वयाच्या २ वर्षापर्यंत उंची बघण्याची काहीही गरज नसते.
आपण जे अन्न वाया घालवतो, टाकून देतो हे बंद केले पाहिजे. गरजेपुरतीच साठा करणे, तयार करणे महत्त्वाचे. अशी कित्येक कुटुंबे आहेत ज्यांना १ वेळेचे जेवणसुद्धा मिळत नाही व उपासमार झाल्याने त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागतात. आता कोरोनाच्या काळातही सुरुवातीस तेच झालेले. लोकांनी लॉकडाऊनच्या भीतीमुळे घरात गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवला, तो वेळेत वापरला गेला नाही (त्याची वापरण्याची कालावधी पण संपली) व नंतर बाहेर कचर्यात फेकण्यात आले. अशाने ज्याला त्या अन्नाची खरोखरच गरज होती त्यांच्याकडे ते पोचू शकले नाही. हे फक्त मनुष्यांच्या बाबतीतच होईल असे नाही तर प्राणी (पशू व पक्षी)पण कुपोषणाचे बळी पडतात. अन्न तर दूरची गोष्ट, उन्हाळ्यात कित्येक प्राणी हे पाणी न मिळाल्यानेदेखील मरण पावतात. त्यासाठी त्यांना किमान पाणीतरी आपण उपलब्ध करून देऊच शकतो ना? म्हणूनच काळजी घ्या स्वतःची व इतरांचीही. वेळेत सावध व्हा अन्यथा एखाद्याचा जीव जाईल. वेळेत तज्ञ वैद्यानां दाखवा व त्यांचा सल्ला, मार्गदर्शन व देखरेखीखाली उपचार घ्या.