अश्‍विनला मांकडिंगपासून रोखणार ः रिकी पॉंटिंग

0
148

इंडियन प्रीमियर लीगच्या मागील मोसमात किंग्स इलेव्हनकडून खेळताना भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याने इंग्लंडच्या जोस बटलर याला ‘मांकडिंग’ चा वापर करत बाद केले होते.

त्यावेळी खिलाडूवृत्ती व क्रिकेटचे नियम याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. सध्या अश्‍विन याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग हा या संघाचा प्रशिक्षक आहे. पॉंटिंग याने मात्र यावेळी अश्‍विन ‘मांकडिंग’सारखा प्रकार करणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला असून आपण अश्‍विनशी यासंबंधी बोलणार असल्याचे सांगितले आहे. ‘मागील वेळी तो आमच्या संघात नव्हता. यावेळी मोठी रक्कम मोजून त्याला संघात घेण्यात आले आहे.

तो शानदार गोलंदाज आहे. दीर्घ काळापासून त्याने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मांकडिंगसारखा त्याने केलेला प्रकार मात्र खपवून घेतला जाणार नाही. मागील वर्षी अश्‍विनने वादग्रस्तरित्या बटलरला बाद केल्यानंतर दुसरे गोलंदाजही अश्‍विनचा कित्ता गिरवू शकतात हे लक्षात आल्यानेच मी माझ्या संघातील सर्व गोलंदाजांना असे न करण्याचे बजावले होते. यावेळी अश्‍विन आमच्या संघात असल्याने संघाच्या मूल्यांप्रमाणे त्याला चालावे लागणार आहे,’ असे पॉंटिग म्हणाला. अश्‍विनने मात्र मागील वेळच्या मांकडिंगचे समर्थन केले होते. क्रिकेटमधील नियमाच्या आधारेच खेळाडूला बाद केल्याचे सांगताना यात खिलाडूवृत्तीचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे म्हटले होते.