कानउघाडणीच्या भीतीनेच बदली : कॉंग्रेस

0
351

कॉंग्रेसने सोमवारी भाजप व अमली पदार्थ माफिया यांचे साटेलोटे पुराव्यासह उघड केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राज्यपालाकडून कानउघाडणी केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच राज्यपाल सत्यपाल मलिक यांची तडकाफडकी बदली केल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. कपिल झवेरी याचे भाजप नेत्यासोबतचे फोटो उघड केल्यावरून राज्यपालांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यामुळेच मलिक यांची तडकाफडकी बदली केल्याच चोडणकर म्हणाले.

सत्य आणि भाजप एकत्र
नांदू शकत नाही ः कामत

वेळोवेळी गोवा व गोमंतकीयांना मार्गदर्शन करणारे व सदैव सत्याची कास धरणारे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्यातून बदली घडवत भाजपने सत्य व भाजप एकत्र नांदू शकत नसल्याचे दाखवून दिल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. ज्यावेळी गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती त्याचवेळी त्यांची बदली होणे हे दुःखदायी असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.

राज्यपालांच्या बदलीमागे
षड्‌यंत्र नाही ः लोबो

मेघालयात बदली करण्यात आलेले गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या बदलीमागे कुठल्याही प्रकारचे षड्‌यंत्र नसल्याचे कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मलिक यांना गोव्यातील राजकीय प्रवाहात राहाणे पसंत पडायचे. आपण त्यांना सुयश चिंतितो असे मंत्री लोबो यांनी सांगितले.