धोनी या एका नावातच भारतीय क्रिकेटच्या मागील दीड दशकांचा इतिहास दडला आहे. लांबसडक केसांची स्टाईल करून भुरळ पाडणारा मजबूत शरीरयष्टीचा झारखंडचा युवक टीम इंडियाचा सर्वांत यशस्वी कर्णधार होऊन निवृत्तदेखील झाला हे मनाला न पटण्याजोगेच आहे. भारतीय सैन्यासाठी काश्मीरमध्ये जाऊन पेट्रोलिंगची जबाबदारी सांभाळणार्या या अवलियाने निवृत्ती जाहीर केली ती सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यदिनी. विश्वचषक स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत धोनी धावबाद होऊन परतला, ती त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची खेळी. भारताला पुन्हा एकदा विश्वचषक मिळवून देऊ न शकल्याचेे शल्य मनाला बोचल्यामुळेच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असेल. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील प्रवास ७ वाजून २९ मिनिटांनी संपला होता. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी हीच वेळ धोनीने निवृत्तीसाठी निवडली. ना गाजावाजा ना गार्ड ऑफ ऑनर काहीच नाही. तंत्रशुद्ध या शब्दाचा धोनीशी कधीच संबंध आला नाही. फलंदाजी करण्याची विचित्र शैली, यष्टिरक्षण करतानादेखील उभे राहण्याची अपारंपरिक पद्धत अनेकांना खटकली. परंतु, धोनीला स्वतःवर असलेला प्रचंड विश्वास त्याला प्रत्येकवेळी तारून नेण्यास पुरेसा ठरला. यष्टिमागील त्याच्या चपळतेच्या जवळपास जाणारे सध्या तरी जगात कुणीही नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फास्टेस्ट स्टंपिगचा विक्रम अजूनही धोनीच्या नावावर आहे हे विसरून चालणारे नाही. सेहवागचा स्फोटकपणा, द्रविडमधील नजाकत, गांगुलीतील आक्रमकता, सचिनचे तंत्र अनेकांना भावले. परंतु, यातील काहीच आत्मसात न करता धोनीने आपल्या स्वतःच्या हॅलिकॉप्टर शॉटने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले. वयाच्या ३९व्या वर्षीदेखील त्याचे रनिंग बिटविन दी विकेट एका षोडशवर्षीयाला लाजवेल असेच होते. मोक्याच्या क्षणी सामना फिरवण्याच्या त्याच्या कर्तृत्वाला तोड नव्हतीे. त्यामुळेच क्रिकेटविश्वात त्याचे हे वेगळेपण सातत्याने अधोरेखित झाले आहे. भारताच्या एकाही कर्णधाराला न जमलेला कारनामा धोनीच्या नावावर आहे. टी-ट्वेंटी विश्वषक, वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या आहेत. कसोटीत धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने अव्वल क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर धोनीने षटकार खेचून भारताला २०११ साली विश्वचषक जिंकून दिलेला क्षण अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनात साठवलेला आहे. पहिल्यावहिल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात इतर सरावलेल्या संघांविरुद्ध टीम इंडियाने दाखवलेला खेळ व धोनीचे कल्पक नेतृत्व खुलून दिसले. मिसबाह उल हक भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विश्वचषकातील अंतिम षटक जोगिंदर शर्मा सारख्या अननुभवी गोलंदाजाला देण्याचा जुगार खेळून भारताला २००७ चा विश्वचषक धोनीने मिळवून दिला. त्याने निवृत्तीची घोषणा करून काही मिनिटांच्या आत सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनीचा सर्वांत विश्वासू व भारताच्या सर्वांत आक्रमक फलंदाजांमध्ये रैनाचे नाव घेतले जाते.
महाभारतातील श्रीकृष्णासारखे टीम इंडियाच्या रथाचे सारथ्य करताना अनेक अर्जुनांमधील प्रतिभा हेरून त्यांना घडविण्याचे, त्यांना पैलू पाडण्याचे काम कॅप्टन कूल माहीने केले. विश्वचषकातील एक्झिटनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा वारंवार झाल्या. त्याच्या चुकीमुळे भारताला वर्ल्डकपमधून बाहेर जावे लागले, अशी टीका त्याच्यावर होत राहिली. त्याच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. अनेकांनी त्याला तत्काळ निवृत्तीचा सल्ला दिला तर अनेकांनी त्याला पुन्हा खेळताना पाहायची इच्छा व्यक्त केली. धोनी टीकेमुळे व्यथितही झाला नाही किंवा पुनरागमनाचा विचारही त्याच्या मनात डोकावला नाही. योग्य वेळेची निवड करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपले वेगळेपण दाखवून दिले. वनडे क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची सरासरी व जवळपास ११ हजार धावांचा डोंगर उभा करून धोनी निवृत्त झाला खरा परंतु, त्याच्या अखेरच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला योग्यरित्या हाताळले नाही, हेच खरे. वयोमानानुसार प्रत्येक खेळाडूप्रमाणे धोनीच्या हालचाली काही प्रमाणात मंदावल्या होत्या हे मान्य, तरीसुद्धा दिग्गजाला त्याच्या उतरत्या काळात कसा सन्मान द्यावा याचा मंडळाला विसर पडणे खटकते. युवा खेळाडूंना घडवण्यात माहीचा मोठा वाटा होता. त्याने खेळाडूपेक्षा नेहमीच देश मोठा मानला. निस्वार्थपणे शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी लढला. त्याची ही लढवय्या वृत्ती उदयोन्मुख खेळाडूंनी आत्मसात केल्यास टीम इंडिया अधिक मजबूत होईल, यात शंका नाही.