पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉस्ता यांच्या गोवा भेटीवेळी आयोजित कार्यक्रम राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकार्यांच्या स्कॅनरखाली असेल. राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने निवडणूक अधिकार्यांची या सोहळ्यावर करडी नजर ठेवणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल सांगितले.
‘‘पोर्तुगीज पंतप्रधान उपस्थित राहणार असलेल्या कार्यक्रमाला आमच्या अधिकार्यांचे पथक उपस्थित राहतील. यावेळी होणारी वक्त्यांची भाषणे राजकीय हेतू प्रेरित नसतील याची खात्री सदर पथकातील अधिकारी करतील’’ कुणाल काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. निवडणूक कार्यालयातील अधिकार्यांचे पथक कॉस्ता यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून भाषणावर लक्ष ठेवणार असून कार्यक्रमावेळी भारत व पोर्तुगाल या देशांचे ध्वज फडकविण्यास कोणतीही बंदी नसेल असे कुणाल यांनी सांगितले.
पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो दि. ११ पासून दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्याला केंद्र तसेच गोवा सरकारने निवडणूक आयोगाकडून संमती मिळविली आहे. गोवा भेटीत ते राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतील. ते खासगी कार्यक्रमांनाही उपस्थित राहतील. त्यांचे वंशज गोमंतकीय असून भेटीदरम्यान दि. १२ रोजी ते मडगाव येथील त्यांच्या पूर्वजांच्या घराला खास भेट देतील.