बेनामी संपत्तीचा कायदा धारदार करणार

0
122

>> ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा इशारा

 

नोटाबंदी निर्णय घेऊन काळ्या पैशाविरुद्ध सुरू केलेल्या लढाईला जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून हा लढा थांबणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील लक्ष्य बेनामी संपत्ती असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २०१६ मधील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना दिला. त्यासाठी बेनामी संपत्तीचा कायदा अधिक धारदार केला जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. दरम्यान, कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी त्यांनी दोन नव्या योजनांची काल सुरुवात केली.

ख्रिसमसच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी ‘मन की बात’ला सुरुवात केली. मोदी म्हणाले की, काळ्या धनाविरुद्ध सुरू केलेली लढाई बंद करू नका, असे आवाहन अनेकांनी केले आहे. देशभरातून पत्रे येत आहेत. त्यामुळे थांबण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. देशात १९८८ मध्ये बेनामी संपत्तीचा कायदा झाला होता. मात्र, त्याचे कोणतेही नियम किंवा त्यांची यंत्रणा तयार केली गेली नाही. भविष्यात हा कायदा अधिक धारदार करून बेहिशेबी मालमत्तेची चौकशी केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले.
…म्हणून नियम बदलले
गेल्या ७० वर्षांच्या बेईमान कारभाराची पाळेमुळे खणून काढण्याचे काम सुरू आहे. ही लढाई सोपी नाही. ते बेईमानीचे नवनवे मार्ग शोधत राहतात. त्यामुळे वेगळे उपाय शोधावे लागतात. नोटाबंदीनंतर सरकार नियमितपणे माहिती घेत होते. जनतेला कोणत्या अडचणी येतात त्याची माहिती जाणून घेऊन कोणते उपाय योजले जाऊ शकतात ते ठरवून नियम बदलले जात होते. यामागे सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही हा हेतू होता असे मोदी यांनी सांगितले.
जनतेच्या सहकार्याने छापे
नोटाबंदीनंतर जनतेच्या माहितीवरून छापे टाकण्याचे सत्र सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले. अनेक जागरूक नागरिक पत्रे पाठवून देशात कोणकोणते घोटाळे सुरू आहेत, त्यांची माहिती देतात. सामान्य नागरिक माहिती पाठवत आहेत. सरकारची सर्व गैरव्यवहारांवर करडी नजर असल्याचा विश्‍वास देत लोकांच्या जागरूकतेमुळे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला यश मिळत असल्याचे मोदी यांनी सांगितले. सरकारने एक ई-मेल पत्ता तयार केला असून त्यावर लोक काळ्याधनाची माहिती पाठवत आहे. सरकार ही लढाई लढण्यास वचनबद्ध असून जनतेची साथ मिळाल्यास हा लढा यशस्वी होईल असे मोदी यांनी स्पष्ट केले.
मोदींनी आपल्या भाषणात भारतीय क्रिकेट व हॉकी संघांना यंदा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. विराट व करुण नायरचा त्यांनी खास उल्लेख केला. हॉकीमध्ये १५ वर्षांनंतर चांगली कामगिरी केली. ज्युनिअर हॉकी संघाने विश्‍वचषक जिंकला. महिला टीमनेही चांगली कामगिरी केली. भारतीय हॉकीसाठी हे शुभसंकेत असल्याचे मोदी म्हणाले.

कॅशलेस वृद्धीसाठी नव्या योजना
ख्रिसमसच्या दिवशी मोदींनी दोन रोख बक्षीस योजनांची सुरुवात केली. ‘लकी ग्राहक योजना’ व व्यापार्‍यांसाठी ‘डीजी धन योजना’ या त्या दोन योजना आहेत. या योजना सुरू झाल्यापासून १०० दिवस चालणार आहेत. या योजनेअंतर्गत नेहमी १५ हजार लोकांना एक हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे. ५० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत खरेदी करणार्‍या ग्राहकांचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. मोबाइल बँकिंग, यूपीएस ऍप व इतर डिजिटल माध्यमातून खरेदी करणार्‍यांचा विचार केला जाईल. कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी ते समजून घेण्यासाठी ग्राहकांसाठी व छोट्या व्यापार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी या योजना आहेत.