>> दीड लाखांच्या सिगारेट्सही पडकल्या
काल सकाळी दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी तीन केरळीयन युवकांना दीड लाख रुपयांच्या सिगारेट्ससह ताब्यात घेतले तर दुसर्या एका घटनेत एका व्यक्तीकडून दोन हजारांच्या २३८ नव्या नोटा जप्त केल्या.
कस्टम अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी दुबईहून गोव्यात आलेल्या एका विमानातून तीन केरळीयन युवकांकडून सिगरेट्सच्या तीन कार्टून्स जप्त केल्या. त्या सिगारेट्सची किंमत जवळ जवळ दीड लाख रुपये आहे. सदर युवक दुबईमार्गे गोव्यात दाखल झाले होते. दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या प्रत्येकाच्या बॅगेत प्रत्येकी एक सिगरेट कार्टून मिळाले. या तिन्ही कार्टूनची किंमत १.५ लाख रुपये होत असल्याचे कस्टम अधिकार्यांनी सांगितले.
दुसर्या एका घटनेत काल दुपारी दाबोळी विमानतळावरून शारजाह येथे एअर अरेबिया या विमानातून जाण्याच्या तयारीत असलेल्या भटकळ येथील युवकाची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत दोन हजार रुपयांच्या २३८ नव्या नोटा सापडल्या. त्या नोटांची किंमत एकूण चार लाख ७६ हजार रुपये आहे. लागलीच त्याला कस्टम अधिकार्यांनी ताब्यात घेऊन त्या नोटा जप्त केल्या. या सर्व युवकांची नावे मात्र उघड करण्यात आलेली नाहीत.