भाजप प्रवेशाने माझा वनवास संपला ः मडकईकर

0
77

>> शंभर कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपात

 

आपण २००५ साली भाजपमधून बाहेर पडलो ती आपली ङ्गार मोठी चूक होती. त्या दिवसापासून आतापर्यंत १२ वर्षे आपण केवळ वनवासच भोगला. आज भाजपमध्ये ङ्गेरप्रवेश केल्याने आपला वनवास संपला असल्याचे कॉंग्रेस आमदार पांडुरंग मडकईकर यांनी काल भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत काल कुंभारजुवेचे कॉंग्रेस आमदार पांडुरंग मडकईकर यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये रितसर प्रवेश केला.
यावेळी मडकईकर यांच्याबरोबर त्यांच्या मतदारसंघातील सुमारे १०० कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात कांता गावडे व प्रवीण कुंकळयेकर यांचाही समावेश होता.
यावेळी पत्रकारांनी मनोहर पर्रीकर यांना माविन गुदिन्हो यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले असताना भाजपने त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला असे विचारले असता त्यांचे समर्थन केले. माविन यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप होता व ते घोटाळे असल्याचे वाटत होते. मात्र, बहुतेक घोटाळ्यातून त्यांची मुक्तता झाली असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. आता त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात केवळ एकच खटला चालू असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, गुदिन्हो यांच्यावर चौकशीत काही आढळून आले तर आम्ही कारवाई करू.