युती मान्य नसल्यास सरकारमधून बाहेर पडावे

0
103

>> मगो आमदारांना विश्‍वास सतरकरांचा सल्ला

युतीच्या सरकारात घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाच्या आमदारांनी भाजपवर टीका करण्यापेक्षा युती मान्य नसल्यास सरकारमधून बाहेर पडावे. मात्र भाजपने आजपर्यंत युतीचा धर्म पाळला असून यापुढेही युती कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती माजी सभापती ऍड्. विश्‍वास सतरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत सतीश मडकईकर, प्रियोळ भाजप मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गावडे, सनत बर्वे व प्रताप वळवईकर उपस्थित होते. साडेचार वर्षे सरकारात राहून लाभ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मगोचे आमदार भाजपवर आरोप करीत आहेत. युती सरकारात वजनदार खाती मागे पक्षाच्या आमदारांना देण्यात आली आहेत. मगोच्या आमदारांना भाजपवर आरोप करावे असे वाटत असल्यास त्यांनी सर्वप्रथम सरकारमधून बाहेर पडावे असे ऍड्. सतरकर यांनी सांगितले.
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रियोळ मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोचे उमेदवार निवडून आले. मात्र मगोच्या आमदारांनी प्रियोळातील भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे पालन भाजप कार्यकर्ते करीत असून मगोला युती नको असल्यास त्यांनी स्पष्ट जाहीर करावे. भाजप स्वबळावर निवडणूका लढण्यास समर्थ असल्याचे ऍड्. सतरकर म्हणाले. भाजप अजूनही युतीसाठी तयार आहे. कारण २०१२ साली निवडणुकीवेळी १० वर्षांसाठी भाजप व मागेची युती निश्‍चित झाली होती. परंतु मगोचे आमदार काही दिवसांपासून आक्रमक पवित्र घेवून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजपावर टीका करीत असल्याचे ऍड्. सतरकर यांनी सांगितले.