भाजपबरोबरील युती तोडण्याचा मगोचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला असून आज सकाळी ११.३० वा. मगो पक्षाच्या कार्यालयात होणार्या केंद्रीय समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु निर्णयाची घोषणा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यानंतरच होऊ शकेल. आजच्या बैठकीत मगो-गोवा सुरक्षा मंचच्या युतीवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
२०१७ च्या निवडणूक युतीसाठी मगोने भाजपकडे १५ जागा मागितलेल्या असून त्यात डिचोली व दाबोळी या मतदारसंघांचा समोश आहे. या प्रस्तावावर मगो तडजोड करण्यास तयार नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचा युतीस विरोध आहे. मगोने स्वबळावरच निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे. भाजपबरोबरील युती तोडण्याचा मगोने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. आजच्या बैठकीवर बरेच काही अवलंबून असल्याचे पक्षाचे पदाधिकारी रत्नकांत म्हार्दोळकर यांनी सांगितले.
पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नारायण सावंत सुरुवातीपासूनच मगोचे कार्यकर्ते युतीस विरोध करीत असल्याचे सांगत होते. पक्षासमोर वेगवेगळे पर्याय असल्याचे सावंत यांनी काल सांगितले. आज सकाळी होणार्या केंद्रीय समितीच्या बैठकीला बरेच महत्व असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मगोने गोवा सुरक्षा मंचबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला तरी भाजपबरोबरील युती तोडण्याचा निर्णन अजून घेतला नसल्याचे मगोच्या एका पदाधिकार्यांने सांगितले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १६ डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.