पंजाबात नुकत्याच झालेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेमध्ये संमत झालेल्या अमृतसर घोषणापत्रात ज्या दहशतवादी संघटनांच्या निर्दालनाचा संकल्प सोडण्यात आला आहे, त्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए महंमद आणि लष्कर ए तोयबा यांचाही समावेश करण्यात आला आहे. केवळ अशा प्रकारच्या समावेशाने पाकिस्तान या दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करणे जरी संभवत नसले, तरीदेखील जेथे आजवरच्या हार्ट ऑफ एशिया परिषदांमधून या संघटनांना दहशतवादी संघटना मानलेही जात नव्हते, तेथे त्यांना दहशतवादी संबोधून त्यांच्या उच्चाटनाचा संकल्प सोडला जाणे हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश आहे. या सहाव्या हार्ट ऑफ एशिया परिषदेचे उद्घाटक व अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख अश्रफ घनी यांनी पाकिस्तानवर जे कठोर शाब्दिक प्रहार केले, तेही या परिषदेचे एक वैशिष्ट्य ठरले आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादाचा धोका जसा भारताला आहे, तसाच तो अफगाणिस्तानलाही आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला पाकिस्तानी प्रदेशांत छुपा आश्रय मिळत आला आहे म्हणूनच ती अजूनही तग धरून आहे. पाकिस्तानचा असा आश्रय नसता तर आम्ही महिनाभरही टिकू शकलो नसतो असे खुद्द तालिबानी नेत्यांनी कबूल केलेले आहे. त्यामुळे तालिबानी दहशतवादाने ग्रस्त असलेल्या घनींना या परिषदेमध्ये पाकिस्तानला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची संधी गवसली आणि तो मोका त्यांनी साधला. ‘‘आम्हाला आपण देऊ केलेले पाचशे अब्ज डॉलर तुम्ही दहशतवादाच्या निर्दालनासाठीच वापरा’’ असेही घनी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. या परिषदेमध्ये भारत यजमान असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला करून औचित्यभंग केला नाही, परंतु घनींनी व्यक्त केलेल्या भावनेशी सहमती दर्शवीत दहशतवादाविरोधात लढण्याचा भारताचा निर्धार अधोरेखित केला. पाकिस्तानला या परिषदेच्या अनुषंगाने आणखी एका बाबतीत फटकार मिळाली, ती म्हणजे नवाज शरीफांचे विदेश व्यवहार सल्लागार सरताज अझीझ यांना सुवर्णमंदिर भेट सुरक्षेच्या कारणाखाली नाकारण्यात आली आणि तेथे पत्रकारांना संबोधित करण्याची त्यांची संधी हुकली. ती संधी मिळाली असती तर बहुधा त्यांनी खलिस्तानचा विषयही ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला असता. या परिषदेच्या निमित्ताने मूठभर खलिस्तानवाद्यांनी निदर्शने केल्याच्या बातमीचा ज्या प्रकारे पाकिस्तानी माध्यमांनी गाजावाजा केला आहे ते पाहता पाकिस्तानचा डाव वेळीच उधळला गेला हे योग्य झाले. इस्लामाबादेतील ‘सार्क’ परिषद उधळली गेल्यानंतर ‘हार्ट ऑफ एशिया’ ही दक्षिण व मध्य आशियाई देशांची महत्त्वाची परिषद असल्याने साहजिकच तिच्याकडे सर्वांचे लक्ष होेते. परंतु ‘सार्क’ परिषदेपासून ज्या प्रकारे पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा प्रयत्न भारताने चालवलेला आहे, तेच धोरण यावेळीही दिसले. राजनैतिक पातळीवर झालेली पाकिस्तानची कोंडी अजूनही फुटलेली नाही. एकही देश उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहण्यास धजावलेला नाही. मात्र, फक्त एकच त्रुटी राहिली ती म्हणजे दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व आशियाई देशांची मिळून एखादी व्यवस्था उभारण्याचा अफगाणिस्तानचा या परिषदेतील प्रस्ताव काही देशांचा प्रतिसाद न मिळाल्याने बारगळला. तेही जर घडले असते तर पाकिस्तानची पुरती कोंडी होऊ शकली असती. काही असो, जे देश दहशतवादाला पाठबळ, आश्रय, प्रशिक्षण आणि पैसा देतात, त्यांच्याविरुद्ध लढण्याचा संकल्प या परिषदेत करण्यात आला आहे हेही नसे थोडके! काहींचे शेपूट शेवटी वाकडे ते वाकडेच असते, परंतु या हार्ट ऑफ एशिया परिषदेने पाकिस्तानला पुन्हा एकवार आरसा दाखवला आहे.