विधानसभा निवडणुकीसाठी वैशिष्ट्यपूर्ण मतदानयंत्र

0
113

>> मतदानाबाबत मतदाराला खातरजमेची व्यवस्था

 

मतदान यंत्राला असलेले बटन दाबून आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर ते त्याच उमेदवाराला मिळाले की नाही असा संशय काही मतदारांना आतापर्यंत पडत असे. मात्र, मतदारांना यापुढे त्याची चिंता करावी लागणार नाही. येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत पेपर ऑडिट ट्रेलची व्यवस्था असलेल्या मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार असून त्यामुळे मतदान केल्यानंतर मतदाराला मतदान यंत्राच्या पडद्यावर त्याने ज्या उमेदवाराला मत दिले त्याचे नाव व चिन्ह पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर आपण ज्या उमेदवाराला मत दिले होते त्याऐवजी जर दुसर्‍याच उमेदवाराचे नाव व चिन्ह पडद्यावर उमटले तर मतदान यंत्राच्या चुकीमुळे आपले मत दुसर्‍याच उमेदवाराला दिले गेले असा दावा करून तो मतदार पुन्हा नव्याने मतदानाची मागणी करू शकेल, असे गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात पहिल्यांदाच अशी व्यवस्था असलेली मतदान यंत्रे यावेळी वापरण्यात येणार असली तरी नवी दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारची मतदान यंत्रे वापरण्यात आली होती अशी माहिती कुणाल यांनी दिली.
एखाद्या मतदाराने मतदान केल्यानंतर त्यांनी ज्या उमेदवाराला मत दिले त्या उमेदवाराचे नाव व त्याच्या पक्षाचे चिन्ह (अपक्ष असेल तर त्याचे स्वत:चे चिन्ह) त्याला मतदान यंत्राच्या स्क्रीनवर दिसू शकेल. सुमारे १२ सेकंदपर्यंत त्याला ते पाहता येईल. या मतदानपत्रिका मतदान यंत्रात जमा होणार असून त्या जपून ठेवण्यात येतील, असे कुणाल यानी स्पष्ट केले. एखाद्या उमेदवाराच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अगदीत कमी मते पडून पराभव झाला व त्याने या कागदी मतांची मोजणी केली जावी अशी मागणी केली तर या कागदीमतांची मोजणी केली जाईल, अशी माहितीही कुणाल यानी यावेळी दिली.