>> रेल्वे वेळापत्रक कोलमडलेलेच
उत्तर भारतात पडलेल्या दाट धुक्यामुळे रेल्वे वेळापत्रक कोलमडले असून कालही परिस्थिती जैसे थे राहिल्याने प्रवाशांवर पुन्हा एकदा प्रतिक्षेच्या यादीत घुटमळत राहण्याची पाळी ओढवली.
दाट धुक्यामुळे रेल्वे मार्गावर समस्या निर्माण झाल्याने गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस वेळापत्रक शनिवार पासून कोलमडलेले आहे. उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे शनिवारी सकाळी ६.३० वाजता पोचणारी ट्रेन रात्री साडे आठ वाजता वास्को रेल्वे स्थानकावर पोचली होती. तर दुपारी ३.१० वाजता जाणारी ट्रेन रात्री ८.३० वा. वास्को रेल्वे स्थानकावरून निघाली होती. तसेच रविवारी येणारी ट्रेन रात्री ८.१५ वा. पोचली. तर वास्कोहून जाणारी ट्रेन रात्री ११.५५ वा. सोडण्यात आली होती.
दरम्यान, परिस्थिती अजून पूर्व पदावर आली नसून कालही वेळापत्रक कोलमडल्याने रेल्वे प्रवाशांना पुन्हा एका या गाड्यांची प्रतिक्षा करावी लागली. काल सकाळी येणारी ट्रेन रात्री ८ वाजता पोचली तर वास्कोहून जाणारी ट्रेन मध्यरात्री १२.३० वाजता सोडण्यात आली.
दरम्यान वास्को रेल्वे स्थानकावरून येणार्या जाणार्या दोन ट्रेन असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले. निजामुद्दीनहून येणार्या ट्रेनची वाट बघून मग हीच ट्रेन परत पाठवण्यास वाट पहावी लागत असल्याने दुपारी ३.१० सुटणार्या ट्रेनवरही याचा परिणाम झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तीन दिवस सदर समस्यांना तोंड देत असूनही तिसर्या गाडीची अजूनही व्यवस्था न केल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त करण्यात येत
आहे.