गोवा-तिरुपती रेलसेवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरु करू असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असून तातडीने संबंधितांशी बोलून याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी कुडचड्यात काल सांगितले. दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे कुडचडे रेल्वे स्थानकाचे र्सौंदर्यीकरण, कुळे-मडगाव मार्गाचे दुपदरीकरण, तसेच रेल्वे उड्डाणपूल बांधण्याच्या कामांच्या शिलान्यास कार्यक्रम कुडचडेतील क्रीडा प्राधिकरण मैदानावर काल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी प्रभू बोलत होते.
गोवा पर्यटन दृष्ट्या आघाडीवर असलेले राज्य असल्याने दुपदरीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असल्याचे सांगितले. या दुपदरीकरणामुळे गोवा कर्नाटकला जोडला जाणार असल्याने कार्गो चळवळीमुळे येथील आर्थिक व्यवहारात वाढ होणार असल्याचे प्रभू म्हणाले. रेल्वेतील पायाभूत सुविधा वाढवण्याबरोबरच भारतीय रेल्वे जागतिक क्रमांकावर सर्वात वरच्यास्थान पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.
इलेव्हेटेड कॉरिडॉर वापराने उड्डाण पूल उभारणी रेल्वे उड्डाणपुलासंबंधी आता इलेव्हेटेड कॉरिडॉर वापरून पुल उभारणी केले जातील. त्यामुळे जमिनीचा कमीत कमी वापर होण्याबरोबरच रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा कमी होईल असे त्यांनी सांगितले.
गोवा हे लहान राज्य असले तरी महत्वाचे राज्य असल्याने सावर्डे हे स्थानक घेऊन आम्ही कामाला सुरुवात केल्याची माहिती त्यानी दिली.
कार्यक्रमाला कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार राजन नाईक, आमदार गणेश गावकर, रेल्वेचे व्यवस्थापक ए. के. गुप्ता (जी.एम.) व इतर अधिकारी, नगराध्यक्ष सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
गोव्यासाठी स्वतंत्र
विभागाची मागणी
आमदार काब्राल यांनी रेल्वेमंत्र्यांकडे गोव्यासाठी एक स्वतंत्र विभाग उभारण्याची मागणी केली. या स्वतंत्र विभागामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने अशा स्वतंत्र विभागाची गरज असल्याचे त्यानी सांगितले. कामराळ येथे लोकांना पुलाखालून जाण्यासाठी त्रासदायक ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठिकठिकाणी उड्डाणपुलांची गरज असल्याचे त्यानी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
नरेंद्र सावईकर यांनी काले येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरु करणे तसेच चांदोर येथील काम सुरु करण्याचे गरज व्यक्त केली. मिरजमार्गे मुंबईला जाणारी रेल्वेही लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रेल्वेच्या स्वतंत्र विभागाच्या मागणीला आपलाही पाठींबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सतीश अग्निहोत्री यांनी रेल्वेने हातात घेतलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. दुपदरीकरणाचे काम येत्या महिन्याभरात हातात घेण्यात येणार असून सौंेदर्यीकरणामध्ये महिलांसाठी खास शौचालय, विकलांगासाठी शौचालय, प्रतिक्षागृह, स्थानकाचे नूतनीकरण आदींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
हॉस्पेट-वास्को
मार्गाचे विद्युतीकरण
हॉस्पेट ते वास्को या मार्गावर विद्युतीकरण करण्यात येईल तसेच तिनईघाट ने वास्को तीन भागात विभागून येथेही आधुनिक तंत्रज्ञान वापरून काम करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.