कॅशलेस अर्थव्यवस्थेची कोनशिला युआयडीच्या माध्यमातू आपल्या सरकारच्या काळात बसविण्यात आली होती. हा विषय टप्प्या टप्प्यातून पुढे नेण्याची गरज असते. सर्वसामान्यांचे हाल करणारा निर्णय घेता येत नाही, असे सांगून चलनातून काळा पैसा काढून घेण्याच्या नावाखाली मोठ्या नोटा रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अमानवी व असंवेदनशील असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल पत्रकारपरिषदेत सांगितले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची कॅशलेस अर्थव्यवस्था करण्याची घोषणाही गरिबांना त्रासदायक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या दि. ८ नोव्हेंबरपासून सामान्य लोकांचे हाल सुरू झाले आहेत. जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९० दिवसांत स्वीस बँकेतील २१ लाख कोटी रुपये आणण्याचे व प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. नोटाबंदीच्या मनमानी निर्णयामुळे सर्वसामान्यांना बँकांमध्य असलेले स्वत:चे पैसे काढणेही अशक्य करून टाकले आहे, असे फालेरो यांनी सांगितले.
काल मडगाव शहरात जनजागृती यात्रेच्यावेळी तेथील व्यापारी सामील झाले होते. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. काल कॉंग्रेसने पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकाला फुले अर्पण करून उत्तर गोव्यातून जनजागृती यात्रेचा आरंभ केला. या यात्रेदरम्यान सरकारच्या जनताविरोधी निर्णयांची जनतेला माहिती दिली जाईल. दि. १३ डिसेंबरपर्यंत यात्रा चालू राहिल अशी माहिती त्यांनी
दिली.