दहा गंभीर गुन्हे नावावर असलेला कुख्यात खलिस्तानी दहशतवादी आणि खलिस्तान कमांडो फोर्सचा नेता हरमिंदरसिंग मिंटू याला पंजाबमधील नाभा तुरुंगातून पलायन केल्यानंतर सुदैवाने दिल्लीत फेरअटक झाली असली, तरी त्याने जो काही कबुलीजबाब दिला आहे, तो गोव्याची झोप उडवणारा आहे. मिंटू आणि त्याचा दुसरा दहशतवादी साथीदार कश्मिरा सिंग हे दोघेही स्वतंत्रपणे गोव्यात आश्रयाला यायला निघाले होते आणि काही दिवसांनी येथून नेपाळ, मलेशिया मार्गे जर्मनीला जाऊन बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या साथीदारांना जाऊन मिळणार होते. या मिंटूचे नातेवाईक गोव्यात आहेत आणि ९० सालापासून ते गोव्यात व्यवसाय करतात असेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. हरमिंदरसिंग मिंटू हा दहशतवादी आहे आणि तो तुरुंग फोडून पळाला आहे हे ठाऊक असतानाही त्याचे हे नातलग त्याला आश्रय द्यायला कसे काय निघाले होते याची चौकशी आता गोवा पोलिसांनी करण्याची आवश्यकता आहे. दहशतवाद्याला आश्रय देणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यासंदर्भात कसून चौकशी झाली पाहिजे. सुदैवाने हरमिंदरसिंग मिंटूला निझामुद्दिन रेल्वे स्थानकावर गोवा एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी आला असता अटक झाली आणि त्याचा डाव उधळला गेला. परंतु प्रत्येकवेळी आपण असे सुदैवी ठरू असे नाही. गोवा हे गुन्हेगारांचे आणि दहशतवादांचे सोपे आश्रयस्थान झालेले आहे असेच अशा प्रकारच्या घटनांमधून दिसून येते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली सुखेनैव गोव्यात येऊन विविध ठिकाणांची संभाव्य हल्ल्यांसाठी रेकी करून गेला होता. इंडियन मुजाहिद्दीनचा यासिन भटकळ हाही काही काळ गोव्यात वास्तव्याला होता. छोटे मोठे किती गुन्हेगार आणि दहशतवादी गोव्यात आश्रयाला येऊन राहून गेले याची तर गणतीच नाही. जे पकडले गेले, त्यापैकी महंमद घौस याने गोव्यात रेकी केलेली होती. दिल्लीत मुदब्बिर शेख आणि रिझवान हे दोघे दहशतवादी पकडले गेले, त्यांनीही गोव्यातील नाविक तळाला लक्ष्य करण्याचे कटकारस्थान आखलेले होते. यातल्या मुदब्बिरने तर एका दलालाच्या मदतीने मडगावात भाड्याने फ्लॅटही घेतला होता. काश्मिरी अतिरेकी तारीक बाटलूपासून कुख्यात गुन्हेगारी डॉन श्याम गरिकापट्टीपर्यंत अनेकांनी गोव्यात सुरक्षित आश्रय घेतल्याचे आजवर आढळून आले आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांच्या गोव्यातील वास्तव्याची आणि हालचालींची गोवा पोलिसांना यत्किंचितही कल्पना नव्हती. राष्ट्रीय तपास संस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांनीच त्यांच्या गोव्यातील वास्तव्याचा छडा लावला. सय्यद अश्फाक हा केरीला येऊन पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेऊन गेला होता. अनेक नक्षलवादी गोव्यात येऊन सुरक्षा रक्षकांच्या नोकर्या पत्करून दडून राहिल्याचे मध्यंतरी उजेडात आले होते. हे सगळे पाहिले तर गोवा म्हणजे आव जाव, घर तुम्हारा अशी स्थिती बनलेली दिसते. ज्या अर्थी हरमिंदरसिंग मिंटूने आपल्या लपण्यासाठी गोव्याचीच निवड केली, त्या अर्थी गोवा हे आपल्यासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण असेल याविषयी त्याची खात्री असावी. त्यामुळेच तो हे धाडस करू शकला. खलिस्तानी दहशतवादी सूड उगवण्याबाबत कुख्यात आहेत. काही खलिस्तान्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची त्यांच्या निवृत्तीनंतर पुण्यात येऊन हत्या केली होती. पंजाबमधील दहशतवादाचा खात्मा करणारे झुंजार पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या गोव्यात जर खलिस्तानवादी आणि त्यांच्या समर्थकांचा सुळसुळाट झालेला असेल तर ती अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणूनच तपास यंत्रणेने या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. अन्यथा हे चिंटू आणि मिंटू एक दिवस गोव्याच्या आणि गोवेकरांच्या मुळावर उठतील.