– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
म्हापसा शहर हे नाट्यकलेची ‘गंगोत्री’ आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय उचलण्याची परंपरा सर्वत्रच दिसत असल्यामुळे असं म्हणणं कदाचित वादाचं ठरू शकेल! पण एक गोष्ट खरी की, निदान गोमंतकात तरी नाट्यकलेचा उगम आणि उदय म्हापसा शहरात झाला याबद्दल शंका उपस्थित करण्याचं कारण नाही.
भारतीय लष्कराने पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोमंतक मुक्त केला. त्यानंतर इ.स. १९६२ मधील डिसेंबर महिन्यात प्रतिवार्षिक कालोत्सवास प्रारंभ झाला. पूर्वी श्री हनुमान जयंत्युत्सवाच्या निमित्ताने श्री महारुद्र संस्थानच्या रामनवमी उत्सवासाठी नाटके सादर करताना एक चौकोनी खड्डा खणून प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या जायच्या आणि खड्ड्याच्या एका बाजूकडील सपाट जमिनीचा उपयोग रंगमंच म्हणून केला जायचा. काहीशी तशाच प्रकारे रंगमंच व प्रेक्षकांना बसण्याची सोय श्री देवी सातेरी देवस्थानच्या कालोत्सवावेळी केली जायची. श्री देवी सातेरी मंदिराच्या जवळच दत्ताराम नार्वेकर यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ रंगमंच होता आणि रंगमंचासमोरच खड्ड्यासारखा खोलगट भाग होता. या सखल भागात नाटकातील संगीताला साथ देणारे हार्मोनिअम आणि तबलावादक बसायचे. त्यामागे प्रेक्षक असायचे. काही खुर्च्यांवर बसलेले तर काही आजूबाजूला उभे असलेले. प्रेक्षक बसत त्या ठिकाणी मंडप वगैरे उभारला जात नसे. प्रेक्षक उघड्यावरच खुर्च्यांवर बसायचे किंवा उभे राहायचे.
त्या वर्षी अचानक कालोत्सवाच्या पहिल्याच रात्री नाटक सुरू होण्यापूर्वीच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस एवढा जोरदार पडत होता की रंगमंचासमोरील खोलगट भाग पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरून गेला व सदर जागेला तळ्याचे स्वरूप आले. प्रेक्षकांची पावसापासून रक्षण करण्यासाठी धावाधाव सुरू झाली, त्यामुळे पहिल्या रात्रीचं नाटक रद्द करावं लागलं. तत्पूर्वी गवळणकाल्याचा उत्सव उरकून घेण्यात आला होता. दुसर्या दिवशीही त्या खोलगट भागातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी तसेच साचून राहिले होते आणि मग कालोत्सव समितीने विचारांती दुसर्या रात्रीचा नाट्यप्रयोगही रद्द केला. त्या वर्षी ‘आग्र्याहून सुटका’ व ‘सं. सौभद्र’ अशी दोन नाटके सादर करण्याचे ठरले होते. तालमीसाठी आणि नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी कलाकार, दिग्दर्शक, आयोजक यांनी बरीच मेहनत घेतली होती. प्रेक्षकांची उपस्थितीही चांगली होती. परंतु पावसाने सगळ्यांनाच नाउमेद आणि नाराज करून सोडले. घडल्या प्रसंगामुळे कालोत्सव समिती व दुसर्या गटातील महाजन यांच्यामध्ये विचारमंथन सुरू झाले आणि असा प्रसंग पुन्हा येऊ नये आणि प्रतिवार्षिक परंपरेत खंड पडू नये, नाटकं सादर करणार्यांच्या मेहनतीवर पाणी पडू नये यासाठी कायमस्वरूपी नसला तरी निदान तात्पुरता मंडप तरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढच्याच वर्षी गवळणकाल्यापूर्वी कालोत्सव समिती, दुसर्या गटातील महाजन, प्रेक्षक व भाविक यांच्या श्रमदानातून व लहान-मोठ्या देणग्यांतून तात्पुरता मंडप उभारून कालोत्सवातील नाटकं यशस्वीरीत्या सादर करण्यात आली.
‘वाईटातूनही बरं घडतं’ या उक्तीनुसार मागच्या वर्षी अचानक कोसळलेल्या पावसामुळे कालोत्सवातील नाटकांचा जो विचका झाला तसा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पक्का मंडप उभारण्याची कल्पना मूळ धरू लागली. सर्वांच्याच आर्थिक सहाय्याने आणि भक्तांच्या श्रमदानाने मंडप उभा राहिला. मंडपात रंगमंच, त्याखाली यज्ञकुंड, मंडपाच्या दोन्ही बाजूना प्रेक्षकांना बसण्यासाठी लांबलचक सिमेंटची बैठक अशी व्यवस्था करण्यात आली. मंडप उभारताना झालेली महाजनांची आणि भाविकांची धावपळ आजही अनेकांना आठवते. खोर्ली परिसरातील हा खुला मंडप सर्वांचेच आकर्षण ठरला. मग तेथे सर्व धार्मिक उत्सव, नाटके होऊ लागली. साहित्यसंमेलन, शैक्षणिक उपक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. बर्याच वेळा सार्वजनिक कार्यासाठी वापरण्यास मंडप दिलेला असल्यास अल्प शुल्क घेतले जाते किंवा तो विनाशुल्कही वापरण्यास दिला जातो. देवस्थानची ही सामाजिक बांधिलकी श्री देवी सातेरीवर असलेल्या भक्तांच्या श्रद्धेत अधिकच भर घालणारी आहे असे मला वाटते. एकदा तर मंडपाच्या तिन्ही बाजूंना पडदे बांधून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आनंद संगीत नाटक मंडळीने महिनाभर मुक्काम करून ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’, ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. मानापमान’, ‘सं. विद्याहरण’, ‘सं. सौभद्र’, ‘सं. देवमाणूस’, ‘आग्र्याहून सुटका’ आदी सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक नाटके सादर केली होती आणि नाट्यरसिकांनी प्रवेशिका विकत घेऊन ही नाटके पाहिली होती.
श्री सातेरी देवस्थानच्या निवडून आलेल्या कार्यकारिणीवरील सदस्यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या काही वर्षांत सातेरी मंडपाला नवीन साज चढवला गेला. या जीर्णोद्धारात मंडप बंदिस्त झाला. नवीन चेहरा घेऊन उभ्या असलेल्या या मंडपाचे आता ‘श्री सातेरी प्रेक्षागार’ असे नामाकरण करण्यात आले आहे. मंडपाचे नूतनीकरण झाल्यावरही देवस्थानची सामाजिक बांधिलकीची वीण अजूनही अतूट आहे. विवाह समारंभ, साहित्यिक कार्यक्रम, सभा, संमेलने, कीर्तन, योगाचे वर्ग आदी कार्यक्रमही या सभागृहात होतात. साधारणतः इ.स. २००२ च्या दरम्यान ‘गोमंतक मराठी अकादमी’ पुरस्कृत ‘राज्यस्तरीय संत साहित्य संमेलन’ही याच सभागृहात संपन्न झाले होते. श्री देवी सातेरी पंचायतनचे सर्व कार्यक्रम याच प्रेक्षागारात होतात.
श्री देवी सातेरी संस्थानातील शिशिरोत्सव
फाल्गुन महिन्यात श्री देवी सातेरी संस्थानात शिशिरोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या शिशिरोत्सवात मोलाचा सहभाग असलेले आमचे एक सन्मित्र पांडुरंग गणेश कोरगावकर यांच्याकडून या श्री सातेरी देवस्थानात साजरा होणार्या शिशिरोत्सवाची बरीच माहिती उपलब्ध झाली. त्यांच्याबरोबरच देवस्थानच्या दोन्ही गटांतील महाजनांनीही यासंबंधी विस्तृत माहिती पुरवली. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे इ.स. १९१० मध्ये जेव्हा श्री सातेरी देवस्थानचा पहिला जीर्णोद्धार झाला त्यावेळी ‘तालगडी’ या नावाने या उत्सवास सुरुवात झाली. हा उत्सव साजरा करताना राधा, कृष्ण, कंस, गोपी, नारद आदी पुराणकाळातील पात्रांचे सोंग घेतलेले कलाकार देवस्थानच्या दुसर्या गटातील महाजनांसमवेत श्री देवी सातेरीच्या आद्यस्थानाला वळसा घालून ढोल-ताश्यांच्या गजरात आणि पेटत्या पलितांच्या उजेडात मिरवणुकीने खोर्ली-सीमेपर्यंत जाऊन पुनश्च मिरवणुकीने मंदिराकडे परतायचे. हा लोककलेचा उत्सव सुरू करण्यामागे कै. भिकू धुरी, कै. विष्णू जडेकर, कै. नारायण वराडकर, कै. रामा आजगावकर, कै. महादेव मालवणकर, कै. कृष्णा पेडणेकर, कै. दत्ताराम पेडणेकर, कै. राजाराम कोरगावकर, कै. बाबलो विर्नोडकर, कै. गोपाळ झारेकर, कै. बाबुराव आराबेकर, कै. गणेश लाडू कोरगावकर यांचे भरीव योगदान आहे.
कालांतराने देवस्थानच्या महाजनांच्या प्रस्तावरूपी विनंतीनुसार पाच दिवसीय नाट्योत्सव सुरू करण्यात आला व ‘तालगडी’ उत्सव साजरा करणे बंद केले. इ.स. १९२१ साली शिशिरोत्सवाच्या निमित्ताने ‘तालगडी’ऐवजी पहिला नाट्यमहोत्सव सुरू झाला. त्यावेळी मंदिराजवळच्या खुल्या आणि मोकळ्या जागेत हंगामी मंडप उभारून नाटकं सादर केली जात असत. पहिल्या नाट्यमहोत्सवात पहिल्याच दिवशी ‘औरंगजेब’ हे ऐतिहासिक नाटक सादर करण्यात आले. कै. भिकू धुरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून हा नाट्यमहोत्सव व्यवस्थित आणि सुविहितपणे पार पडावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. शिशिरोत्सवातील नाट्यमहोत्सव यशस्वीरीत्या पार पडावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या समितीचे पहिले अध्यक्ष कै. भिकू धुरी हे मग पुढील पंधरा वर्षे समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या काळात ‘मुरारबाजी’, ‘कालिया’, ‘सम्राट’, ‘औरंगजेब’ आदी अनेक ऐतिहासिक नाटके तत्कालिन बुजूर्ग कलाकारांनी सादर केली. इ.स. १९३५ साली कै. कृष्णा भिकू आजगावकर हे एक प्रतिथयश गायक कलाकार देवस्थानच्या शिशिरोत्सव समितीचे अध्यक्ष बनले. नाटकांच्या सादरीकरणास त्यांनी बरेच प्रोत्साहन दिले. त्यानंतर कै. गडेकर, कै. नरेंद्र साळगावकर, कै. शाणू किनळेकर, कै. प्रभाकर साळगावकर, कै. महादेव साळगावकर, कै. श्यामसुंदर आरोलकर व आनंद गडेकर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
महागाईमुळे नाटकांचा वाढता खर्च आणि शिशिरोत्सवासाठी समितीने देणग्यांच्या स्वरूपात गोळा केलेली रक्कम यांचा मेळ बसेना म्हणून इ.स. १९७४ साली पाच नाटकांचा हा महोत्सव तीन नाटकांवर सीमित करण्यात आला. मोहन कृष्णा मांद्रेकर, आनंद आजगावकर, उल्हास धुरी, उल्हास बर्डे आदीनी समितीचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले. त्यानंतर आजवर पांडुरंग गणेश कोरगावकर हे सातत्याने गेली वीस वर्षे समितीचे अध्यक्षपद भूषवीत आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शिशिरोत्सवात संध्याकाळच्या वेळी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून श्री देवी सातेरी देवस्थानच्या परिसरात गुलालाची उधळण केली जाते. पांडुरंग गणेश कोरगावकर यांना सध्या समितीतील मोहन कृष्णा मांद्रेकर (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर देसाई (मुखत्यार), संजय कर्पे (सचिव), पांडुरंग वराडकर (सहमुखत्यार), मनोज आजगावकर (सहसचिव) व मुकुंद रंकाळे (खजिनदार) यांचे सहकार्य लाभत आहे.
शिशिरोत्सवातील तिसर्या नाटकाच्या सादरीकरणाअगोदर श्री देवी सातेरीची पालखी मिरवणूक रात्रौ दहा वाजता मंदिरातून निघून पश्चिम दिशेकडील आद्यस्थानाला वळसा घालून श्री गणेश मंदिराकडून पुन्हा मंदिराकडे आणून नाटकाच्या प्रेक्षागारात स्थानापन्न केली जाते. त्यानंतर रंगमंचावरील दर्शनी पडदा उघडताच आपल्या दोन साथींसह हरिदास वाजत-गाजत रंगमंचावर येतो आणि आपल्या सुरेल आवाजात नाट्यगीते व भावगीते सादर करतो. आजवर हरिदासाची भूमिका कै. बाबलो विर्नोडकर व कै. अर्जुन विर्नोडकर हे साकारत आले होते. सध्या हरिदासाची ही भूमिका दिगंबर विर्नोडकर हे वठवतात. शिशिरोत्सवातील नाटकांचं यश हे गेल्या काही वर्षांतील रसिकप्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून कुणाच्याही ध्यानी यावं. यात पांडुरंग कोरगावकर, गोपाळ राऊळ, श्यामसुंदर पेडणेकर, शाबी किटलेकर, म्हाबळेश्वर रेडकर, सूर्या नाईक, पांडुरंग वर्हाडकर आदी नाट्यकलाकारांचा फार मोठा सहभाग असतो.
देवदेवतांच्या वास्तव्यानं पुनीत आणि पावन झालेल्या व निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या परशुरामाच्या या गोमंतभूमीत म्हापसा शहर हे ‘कलेचं माहेरघर’ म्हणून सर्वपरिचित आहे. यापूर्वीच उदाहरणासहित मी म्हटलं होतं की, म्हापसा शहर हे नाट्यकलेची ‘गंगोत्री’ आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय उचलण्याची परंपरा सर्वत्रच दिसत असल्यामुळे असं म्हणणं कदाचित वादाचं ठरू शकेल! पण एक गोष्ट खरी आहे की, निदान गोमंतकात तरी नाट्यकलेचा उगम आणि उदय म्हापसा शहरात झाला याबद्दल शंका उपस्थित करण्याचं किंवा वाद घालण्याचं कारण नाही. यासंबंधीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. म्हापशात अनेक नामवंत नाट्यकलाकार, नाट्यलेखक, साहित्यिक, साहित्य समीक्षक, शिल्पकार, रंगारी, गायक, हार्मोनिअम व तबलावादक होऊन गेले. त्यानी म्हापशाबरोबरच संपूर्ण गोमंतकाचे नाव दिगंतात नेले. विविध कलांच्या संवर्धनाचे कार्य म्हापशाची धारगळस्थित श्री देवी शांतादुर्गा, श्री महारुद्र, श्री विठ्ठल-रखुमाई या देवस्थानांनी मोठ्या प्रमाणात केले आहे.
श्री देवी सातेरी देवस्थानच्या साडेचारशे वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या वाटचालीत कालोत्सव व शिशिरोत्सव आणि श्री देवी सातेरीची पालखी नगरप्रदक्षिणा आदी उत्सवांतून खोर्ली परिसरातील अनेक बुजूर्ग आणि दिग्गज कलाकारांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा आविष्कार श्री देवी सातेरी देवस्थानच्या रंगमंचावर सादर करून आपली सेवा ‘श्री’चरणी अर्पण केली आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही देवस्थानातील विविध उत्सव हे सांस्कृतिक संवर्धन, समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. या योगदानात खोर्ली येथील श्री देवी सातेरी देवस्थानातील उत्सव आपला खारीचा वाटा उचलत असतात.
श्री सातेरी देवीची शिशिरोत्सवातील नाटकाच्या सुरुवातीस म्हटली जाणारी नांदी-
शरण शरण शरण तुजं मी देवीऽऽऽ
सातेरी माते जननी ॥
विनुतीऽऽ विनंतीऽऽ
कीर्ती पसरवी अमुची ॥
वास असो पदकमली
आस ही भारी
सुयज्ञाते देई अम्हा
रंगभूवरी, रंगभूवरी ॥
अज्ञ लेकुरें जमली
तुझिया चरणी
आशीर्वच मागत ती
तुज पदोपदी तुज परोपरी ॥