पंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रे बसविण्याचा सरकारचा आदेश

0
89

राज्यातील काही पंचायत कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहात नसल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने प्रत्येक पंचायत कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रे बसविण्याचा आदेश देणारे परिपत्रक सर्व पंचायतींना पाठविल्याची माहिती पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी दिली. येत्या १५ ऑगस्टपर्यंत वरील यंत्रे न बसविल्यास संबंधित पंचायतींच्या सचिवांवर निलंबित होण्याचा प्रसंग ओढवू शकेल.

गट विकास अधिकार्‍यांच्या माध्यमातून पाठविलेल्या या परिपत्रकांमुळे पंचायत सचिवांसह कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली आहे. वरील यंत्रे खरेदी करण्यासाठी लागणारा निधी पंचायत मंडळाने मंजूर करणे आवश्यक आहे. काही पंचायतीतील पंच सदस्यांचा बायोमेट्रिक यंत्रासाठी निधी खर्च करण्यास विरोध आहे. या प्रकारामुळे सचिव भयभीत झाले आहेत. यासंबंधी पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांना विचारले असता, त्यांनी वरील यंत्रे बसविण्यास सहकार्य न करणार्‍या सचिवांनी यासंबंधिचा रितसर अहवाल खात्याला पाठवून देण्याची सूचना केली आहे. अशा पंच सदस्यांवर कारवाई करण्याची तरतूद असल्याचे पिळर्णकर यांनी सांगितले. सचिवांनी वेळेवर अहवाल सादर न केल्यास सचिवांवरील कारवाई अटळ असल्याचे पिळर्णकर यांनी सांगितले.