सरकार मोफत एलईडी बल्ब देणार

0
104

>> ८ रोजी योजनेचा शुभारंभ : मुख्यमंत्री

 

केंद्र सरकारच्या उजाला या योजनेखाली राज्यातील ४ लाख ८४ हजार ८८६ घरगुती वीज ग्राहकांना प्रत्येकी तीन एलईडी बल्ब वितरीत करणारी ‘ज्योतीर्गमय गोवा’ ही योजना येत्या ८ ते २० जुलै या काळात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मोफत एलईडी बल्ब पुरविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येक गावात बल्ब वितरणाचे कार्यक्रम होतील. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. अतिरिक्त बल्ब खरेदी करण्याची व्यवस्था असेल. बाजारपेठेत प्रती बल्बची किंमत ३०० ते ४०० रुपये आहे. आपल्या सरकारने वरील अतिरिक्त बल्ब ७६ रु. ६८ पैसे दराने उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. या योजनेमुळे ८० टक्के वीजेची बचत होईल व बचत झालेली वीज अन्य कारणासाठी म्हणजे उद्योगासाठी वापरणे शक्य होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. घरगुती वापरासाठीच्या विजेची प्रती युनिटची किंमत ५ रुपये ५ पैसे इतकी असते. सरकार अनुदान देत असल्याने ग्राहकाला २ रु. ९२ पैसे या दरात वीज मिळते. घरगुती वापरासाठी वर्षाकाठी ७ कोटी ७८ लाख ९६ हजार ९३५ युनिट वीज लागते. सरकार वीजेवर ११ कोटी १५ लाख ४३ हजार १७५ रुपये अनुदान स्वरूपात खर्च करते. एलईडीच्या वापरामुळे सुमारे ५ कोटी ४३ लाख ७७ हजार रुपयांची बचत होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ज्योतिर्गमय गोवा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रती ग्राहकाला वीजेचे बील पुरावा म्हणून सादर करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. एलईडी बल्बची आयु मर्यादा सर्वसाधारण बल्बांपेक्षा ५० पटीने अधिक असल्याचे ते म्हणाले. राज्यात लवकरच डिजीटल मीटर पध्दत सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वीज गळतीवर व वीज चोरीवर नियंत्रण येईल. एखाद्या ग्राहकाने आपल्या घरातील वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास वीज खात्यातील यंत्रणेतर्फे त्याचे चित्रीकरण होईल असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस वीजमंत्री मिलिंद नाईक उपस्थित होते.