गोव्यात येत्या निवडणुकीत आणखी २७१ मतदान केंद्रे

0
74

एकूण १६११ केंद्राचा प्रस्ताव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी येथील मुख्य निवडणूक अधिकारी गणेश कोमू यांनी काल बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय व निर्वाचन अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून २७१ अतिरिक्त मतदानकेंद्रे उघडण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोमू यांनी सांगितले.

वरील प्रस्ताव लवकरच केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवून देणार असून आयोगाची मान्यता मिळताच त्याची अमलबजावणी होईल, असे ते म्हणाले. मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागतात, त्यामुळे मतदान प्रक्रियेस विलंबही लागतो. मतदान जलदगतीने व्हावे व मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी वरील निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे मतदान केंद्र मतदारांच्या घरापासून दूर असू नये यासाठी ते जवळ उघडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्तर गोव्यात ७८२ तर दक्षिण गोव्यातील ५५७ मिळून एकूण १४३९ मतदान केंद्रे आहेत. त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे आता मतदार केंद्राची संख्या १६११ होईल. २० जानेवारीपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले. दुहेरी नावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मतदाराचे नाव दोन किंवा अधिक ठिकाणी असले तरी ते त्वरित शोधून काढणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व मतदारयाद्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील आयोग दि. १६ रोजी गोव्यात येणार असल्याची माहिती कोमू यांनी दिली. वरील बैठकीस कॉंग्रेसतर्फे एम. के. शेख, भाजपतर्फे केशव प्रभू व मगोतर्फे रत्नकांत म्हार्दोळकर उपस्थित होते. गोवा सुराज पार्टीचेही प्रतिनिधी उपस्थित होते. प्रदेश राष्ट्रवादी, सेव्ह गोवा व युगोडेपाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.

विधानसभा विसर्जित झाल्यानंतर निवडणुकीच्या तयारीसाठी तीन महिन्यांच्या कालावधीची आवश्यकता आहे, असे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबरपूर्वी विधानसभा बरखास्त होईल व त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होईल, या दृष्टिकोनातूनच निवडणूक अधिकार्‍यांनी तयारी सुरू केली आहे.