खाजगीकरणाने घटनादत्त अधिकार हिरावले : माने

0
100

>>युगनायक, कला अकादमी व कला-संस्कृती खात्यातर्फे आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक माणूस, एक मत, एक मूल्य दिले. भांडवली अर्थ व्यवस्था स्वीकारल्याने आज खाजगीकरण आले आणि या खाजगीकरणामुळे घटनादत्त जे अधिकार दिले होते ते हिरावून घेतले गेले. असे प्रतिपादन ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी येथे केले. युगनायक-गोवा, कला अकादमी गोवा, आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा शासन यांच्या संयुक्त मा. दीनानाथ कला मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. माने बोलत होते. उपसभापती तथा कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित होते. युगनायकचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव हे यावेळी व्यासपीठावर होते.
श्री. माने यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर हे कायदे पंडित, घटनातज्ज्ञ होते तरी त्यांच्या सर्व पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. त्यांना कायदेमंत्री करण्याऐवजी अर्थमंत्री केले असते तर भारताचे आजचे चित्र वेगळे दिसले असते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देवून त्यांनी आपला समाज शिकला पाहिजे यावर भर दिला. पैसेवाले आपल्या मुलांना वाट्टेल तो खर्च करून इंग्रजी शिकवतात पण ज्यांच्या घरी दारिद्य्रच आहे त्यांचे काय? असा प्रश्‍न करून श्री. माने यांनी मुले शंभर टक्के इंग्रजीच शिकणार असतील तर संस्कृतीचे वाटोळेच होणार याकडे त्यांनी निर्देश केला. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुर्‍या होत नसतील तर तो संविधानाचा अपमान आहे असे नमूद करून माने यांनी सांगितले की, आज संख्या लिहिता येणार नाही एवढा भ्रष्टाचार माजलेला असताना मताची किंमत कळत नसेल तर आपण गुलाम म्हणून जगण्याच्याच लायकीचे आहोत.
मंत्री मांद्रेकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी देशाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्यासारख्या थोर महामानवांमुळेच आम्ही स्वातंत्र्याफळे चाखतो आहोत. लोकशाही पध्दतीने राज्यकारभार चालविणारी घटना बाबासाहेबांनी दिली. त्यांनी माणूसधर्म शिकविला तेव्हा आपला जन्म सार्थकी व्हायला हवा. श्री. वाघ म्हणाले, ज्यांचा जयजयकार आपण आज करत आहोत ते नेमके कुठे आहेत याचा शोध घ्यायला हवा. त्यांचे विचार मान्य आहेत का? ज्या रुढी परंपरावर त्यांनी आघात केले त्या प्रथा आपण चालवणार आहोत का? मनुस्मृतीला पायाखाली तुडविणार्‍या बाबासाहेबांना आपण नव्या युगाचा मनू म्हणावे? उ. प्र., बिहारमधील उघडपणे जाती व्यवस्था चालते त्यापेक्षा गोव्यातील छुपी जात व्यवस्था भयानक असल्याचे स्पष्ट करून श्री. वाघ यांनी सांगितले की गोवा लवकरात लवकर मुक्त व्हावा हे आंबेडकराचे स्वप्न होते.
प्रास्ताविकात चंद्रकांत जाधव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या शताब्दी वर्षात आम्ही तिनशेजणांनी बुध्द धर्म स्वीकारल्याचे सांगून १९९१ मध्ये युगनायक संस्था जन्माला घातल्याचे ते म्हणाले. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आम्ही मदतीचा हात देतो. मानव मुक्तीच्या बाबासाहेबांच्या लढ्यात योगदान देत आहोत. मंत्री मांद्रेकर यांच्या हस्ते आंबेडकर चळवळीतील भीमराव माटे या शिक्षकाला युगनायकतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरपालिकेवर राखीव जागांवर निवडून आलेले रितेश पेडणेकर (पेडणे), कु. कविता आर्लेकर (म्हापसा) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात संगीतकार सदानंद आमोणकर यांनी उत्कृष्ट स्वागत गीत बसविल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. ओंकार गोवेकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. युगनायकचे उपाध्यक्ष परेश पार्सेकर व सरचिटणीस श्रीकांत नारुलकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ अर्पण केले. सायंकाळच्या सत्रात औरंगाबाद येथील निर्माता, दिग्दर्शक तथा गायक प्रा. बुध्दरत्न लिहितकर व साथींचा डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्याचा काव्यात्मक, संगीताच्या माध्यमातून आविष्कार घडविणारा गाथा भीमरायाची हा शाहिदी कार्यक्रम झाला.