‘१०८’च्या ११ रुग्णवाहिकांचे अज्ञातांकडून टायर पंक्चर

0
119

पोलीस तक्रारीत संपकर्‍यांवर संशय
गोमेकॉ परिसरात जीव्हीके या कंपनीने पार्क करून ठेवलेल्या आपल्या १०८ या रुग्णवाहिकांचे टायर शनिवारी रात्री अज्ञातांनी पंक्चर केल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. एकूण ११ गाड्यांचे टायर पंक्चर करून टाकण्याची घटना घडली असून याविषयी आगशी पोलिसात रितसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.कंपनीचे कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासून संपावर असून त्यांनीच हे कृत्य केले असावे, असा संशय कंपनीच्या अधिकार्‍यांनी आगशी पोलिसांकडे तक्रार नोंदवताना व्यक्त केला आहे. यासंबंधी एका अधिकार्‍याने सांगितले की केवळ टायरच पंक्चर करण्यात आले नाहीत, तर इंजिनाला डिझेलचा पुरवठा करणारी पाईप्सही कापून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व गाड्यांतील डिझेल गाड्यांबाहेर सांडले आहे. शिवाय हे कृत्य करणार्‍या आरोपींनी रुग्णवाहिकातील काही वैद्यकीय अवजारे व साहित्यही लांबवले. तसेच डिझेल टँकमध्ये माती व साखर घालण्याचे कृत्यही केले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. अज्ञातांनी केलेल्या या कृत्यामुळे कंपनीला सुमारे ५ लाख रु.चे नुकसान झालेले आहे, असे सांगण्यात आले.
संपकर्‍यांकडून आरोपाबाबत इन्कार
दरम्यान, संपावर असलेल्या कर्मचार्‍यांच्या संघटनेचे नेते हृदयनाथ शिरोडकर म्हणाले की वरील घटनेशी आमचा संबंध नाही. संपावर असलेल्या कर्मचार्‍यांना अडचणीत आणण्यासाठी जीव्हीके कंपनीच्या व्यवस्थापनानेच हे कृत्य केले असावे. आम्ही आतापर्यंत शांततापूर्णरीत्या आंदोलन केलेले असून आमचे साखळी उपोषणही गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, या कर्मचार्‍यांच्या एक नेत्या स्वाती केरकर म्हणाल्या की संपावर असलेल्या कर्मचार्‍यांनी रुग्णवाहिका पंक्चर करण्याचे कृत्य केलेले नसून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई केल्यास आम्ही ते सहन करणार नाहीत.
दरम्यान, या कर्मचार्‍यांचे साखळी उपोषण काल तिसर्‍या दिवशीही चालूच होते. काल सात कर्मचार्‍यांनी साखळी उपोषणात भाग घेतला. दरम्यान, यासंबंधी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना विचारले असता चौकशीनंतरच हे कृत्य कुणी केले ते उघड होणार असल्याचे ते म्हणाले.